| अलिबाग | प्रतिनिधी |
एमबीबीएसचे प्रवेश देण्याचे अमिष दाखवून विद्यार्थ्यांची 32 लाख 50 हजार रुपयांची लुट करण्यात आली आहे. अलिबाग येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील हा प्रकार असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकिय वैद्यकिय महाविद्यालय गेल्या दोन वर्षापासून अलिबागमध्ये सुरु झाले आहे. एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया मेरीटद्वारे केली जात असून ऑल इंडिया व राज्य या दोनच कोट्यातून प्रवेश दिले जाते. मात्र भावी डॉक्टरांना एमबीबीएस प्रवेश स्पेशल कोट्यातून देण्याचे अमिष दाखविणारी टोळी सक्रीय झाली आहे.
पंकज मेहता, अनिल मंडल व नारायण खरमोडे या तिघांनी कोल्हापुर येथील अभिजीत वणिरे यांना विश्वासात घेत त्यांच्या मुलीला अलिबागमधील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश स्पेशल कोट्यातून देण्याचे अमिष दाखविले. तिघांच्या अमिषाला वणिरे बळी पडले. एमबीबीएस प्रवेशासाठी 32 लाख 50 रुपयांची त्यांनी मागणी केली. त्यानुसार 27 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अलिबागमधील रविकीरण हॉटेलमध्ये तिघांकडे 32 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र वणिरे यांच्या मुलीला प्रवेश मिळाला नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.