| पनवेल | वार्ताहर |
सट्टा बाजारात गुंतवणूक करा आणि भरघोस परतावा मिळवा अशा आशयाच्या जाहिरातीला बळी पडून खारघर येथील एका व्यक्तीने एक कोटी 10 लाख 32 हजार रुपये गमावले आहेत. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंतवणूक करा अल्पवधीत भरघोस नफा कमवा अशा आशयची जाहिरात खारघर येथे राहणार्या एका व्यक्तीने समाज माध्यमावर पाहिली आणि सहज म्हणून त्यांनी त्या जाहिरात लिंकवर क्लिक केले. क्लिक करताच त्यांचा समावेश एका व्हाट्स अँप समूहात झाला त्या ठिकाणी अल्पवधीत कमी गुंतवणूकीवर भरघोस नफा कसा कमावावा याचे मार्गदर्शन केले जात होते. हे सर्व खरे वाटून तक्रारदार यांनी 6 एप्रिल ते 19 मे दरम्यान एक कोटी 10 लाख 32 हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर चार पट परतावा अॅपवर दिसत होता. मात्र, प्रत्यक्षात बँक खात्यात ही रक्कम वळती होत नव्हती. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले.