| पनवेल | वार्ताहर |
युवा किसान फार्मर कंपनीची 75 लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. कंपनीचे आर्थिक व्यवहार सांभाळणार्या कामगाराला अज्ञाताने चॅटिंग करून तो डायरेक्टर असल्याचे भासवून फसवणूक केली आहे.
कंपनीच्या कामोठे परिसरात राहणार्या कामगारासोबत हा प्रकार घडला. हा कामगार रविवारी सुट्टी असल्याने घरी असताना त्यांना अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप मेसेज आला होता. त्या नंबरच्या प्रोफाइलवर त्यांच्या डायरेक्टरचा फोटो होता तसेच मेसेज करणार्याने तो डायरेक्टर असून, त्यांचा नवीन नंबर असल्याचे सांगितले. दुसर्या दिवशी त्या तोतयाने कामगाराला मेसेज करून कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगितले. शिवाय कंपनीच्या बँक खात्यातून 75 लाख रुपये पाठवण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून कामगाराने नमूद खात्यात ही रक्कम पाठवली. कंपनीचे मूळ डायरेक्टर श्रीकांत कोठावळे यांना खात्यातून पैसे पाठवल्याचे लक्षात आले. त्यानंतर याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.