कर्जाच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

कठोर कारवाई करण्याची मागणी

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केंद्रे यांनी ग्राहकांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय विजय पाटील, दीपक अशोक मोरे, रुपाली शैलेश किल्लेकर, सागर शरद वाघमारे, अनिल राजाराम घुटुकडे, जितेंद्र नारायण थळे अशी पीडितांची नावे असून हे सर्व उरण मधील रहिवाशी आहेत. यांच्याव्यतीरीक्त शेकडो ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पीडीत ग्राहक उरण शहरातील कामठा रोडवरील मॅनेजर सागर कोळी व प्रोप्रायटर अमर केंद्रे यांच्या अमर ग्लोबल मोबाईल शॉपमध्ये वारंवार खरेदीविक्री करण्यासाठी येत असल्यामुळे त्यांच्यासोबत या ग्राहकांची ओळख झाली होती. यानंतर सागर कोळी याने या नागरिकांना वेगवेगळ्या तारखेला बोलावून त्यांना त्यांच्या नावाने कर्ज काढण्यासाठी ऑफर दिली व त्यापासुन त्यांना कौटुंबिक खर्चासाठी मदत म्हणुन फायदे मिळतील, असे ग्राहकांना आमिष दाखविले. तसेच, अमर केंद्रे यांनी या कर्जाबाबत ग्राहकांना आश्‍वासन दिल्यामुळे ग्राहकांनी सागर कोळी यांच्या शब्दांवर पुर्णपणे विश्‍वास ठेवला. ग्राहकांना देखील कौटुंबिक व मुलांच्या खर्चासाठी मदत मिळणार म्हणुन सागर व अमर यांना कर्ज काढण्यासाठी परवानगी दिली. तसेच, कर्जाचे सर्व हफ्ते सागर कोळी भरणा करेल, असे ग्राहकांना सांगीतले. तसेच, अमर केंद्रे याने देखील या गोष्टीला दुजोरा दिला.

यानंतर सागर कोळीने ग्राहकांच्या नावाने ऑनलाईन कर्ज काढले असून मागील काही महिन्यांपासुन हफ्त्याची रक्कम त्याने भरलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना या प्रकरणाचा मोठया प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच या कर्जासाठी आश्‍वासन देऊन अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील प्रोप्रायटर अमर केंद्रे याने अनेक सामान्य ग्राहकांची फसवणुक करुन फरार झाला आहे. तसेच, मॅनेजर सागर कोळीने ग्राहकांच्या नावाने मोठ्या रक्कमेचे लोन काढले असुन याबाबत त्याला विचारणा केली असता, तो तुम्हाला काय करायचे आहे ते करा, असे सांगुन ग्राहकांना दमदाटी करीत आहे.

अशाप्रकारे अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी व प्रोप्रायटर अमर केंद्रे यांनी ग्राहकांचा विश्‍वासघात करुन अनेक सर्वसामान्य ग्राहकांची पुर्णपणे फसवणुक केली आहे. त्यांच्या फसवणुकीमुळे ग्राहकांना खुप मोठया प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. तरी पोलीस प्रशासनाने सागर कोळी व अमर केंद्रे यांच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी व फसवणूक झालेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पीडितांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी माझी भेट घेतली आहे. अमर मोबाईल शॉपच्या अमर केंद्रे यांना याबाबत कळविले आहे. अमर केंद्रे यांनी सर्व ग्राहकांचे पैसे देतो असे कबूल केले आहे. अमर केंद्रे याला आठ दिवसांची मुदत दिली होती. फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

राजेंद्र कोते-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण
Exit mobile version