पनवेलमध्ये 72.98 लाखांची फसवणूक

| पनवेल | प्रतिनिधी |

गुंतवणुकीची रक्कम अवघ्या महिनाभरात दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून चार जणांची तब्बल 72 लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. उरण तालुक्यातील जेएनपीटी टाऊनशिप, पिरकोन आणि करंजा परिसरातील रहिवाशांनी याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कोप्रोली येथे राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिनाभरात मोठा आर्थिक परतावा मिळण्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी लाखो रुपये दिले; मात्र मुदत उलटूनही मूळ रक्कम आणि परतावा न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने पनवेल शहरातील ओरियन मॉल येथे पहिल्या गुंतवणूकदाराची भेट घेतली होती. यावेळी महिन्याभरात गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे तसेच मूळ रक्कम सुरक्षित राहील, असे आश्वासन तिने दिले. या आमिषाला बळी पडून उरण तालुक्यातील कोंढरीपाडा (करंजा) येथील 31 वर्षीय व्यक्तीने 8 सप्टेंबर रोजी चार लाख रुपये, तर 9 सप्टेंबर रोजी आणखी 98 हजार रुपये गुंतवले. त्यानंतर अन्य तीन व्यक्तींनीही या योजनेत लाखो रुपयांची गुंतवणूक केली. अशा प्रकारे चार जणांकडून एकूण 72 लाख 98 हजार रुपये स्वीकारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. गुंतवणुकीनंतर महिनाभराचा कालावधी उलटूनही ठरल्याप्रमाणे दुप्पट रक्कम मिळाली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, संबंधित महिलेकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय गुंतवणूकदारांना आला. अखेर त्यांनी पनवेल शहर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.

Exit mobile version