| पनवेल | वार्ताहर |
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 18 वर्षीय अभिनेत्रीला वेबसिरिजमध्ये काम देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये घडला असून, पीडितेने डीएन नगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी पीडितेला व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला होता. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख प्रॉडक्शन हाऊसचा निर्माता म्हणून सांगितले. त्याने मेसेज करून वेबसिरीजमध्ये काम करण्याची ऑफर दिली. या फसवणुकीला बळी पडून अभिनेत्रीने तिचा पोर्टफोलिओ, इन्स्टाग्राम प्रोफाइल आणि यू्ट्यूब लिंक्स शेअर केल्या. त्यानंतर आरोपीने तिच्याशी संपर्क साधला आणि तिची दुसऱ्या तरूणाशी ओळख करून दिली. तरूणीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी अनेक गोष्टी केल्या. एवढेच नाही तर तिला मेट्रो आयनॉक्स थिएटरमध्ये बोलावण्यात आले आणि चित्रपट दाखवण्यात आला. जेव्हा अभिनेत्रीने पुन्हा भेटण्यास नकार दिला तेव्हा तिला ब्लॅकमेल करण्यात आले. आरोपीने मॉर्फ केले अश्लील छायाचित्र अभिनेत्रीला पाठवले. तसेच, 40 हजार रूपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मॉर्फ केलेले फोटो कुटुंबाला आणि सोशल मीडियात व्हायरल करण्याची आरोपींनी धमकी दिली. सततच्या धमक्यांना कंटाळून तिने धाडसाने पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. पीडितेने डीएन नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून डीएन नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.