| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून एका 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने पीडित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढून तो पसरवण्याची धमकीही दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास सुरू केला आहे.
पुणे शहरातील कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी (दि. 02) रात्री साडे सातच्या सुमारास डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्या सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये आरोपी गेला आणि तुमचे कुरिअर आल्याचे पीडित तरुणीला म्हणाला. हे कुरिअर माझे नसल्याचे तिने सांगितले. तरीही तुम्हाला सही करावी लागेल असे आरोपीने सांगितले. त्यामुळे पीडित तरुणीने सेफ्टी डोअर उघडले. त्याचवेळी आरोपीने पीडित तरुणीच्या तोडांवर स्प्रे मारला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर आरोपीने तिच्याच मोबाईलने सेल्फी काढत परत येईल, असे टाईप करून ठेवले आणि तेथून पळ काढला.
काही वेळाने पीडितेला शुद्ध आल्यानंतर हा भयानक प्रकार तिच्या लक्षात आला. त्यानंतर तिने कोंडावा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.