श्री बल्लाळेश्वर देवस्थान अन् नगरपंचायततर्फे भोजन
| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
पाली सुधागडसह रायगड जिल्ह्याला धुवाधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पाली नदीला आलेल्या भीषण पुरामुळे संपूर्ण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पुराच्या पाण्यामुळे शहराला जोडणारे तीनही बाजूंचे प्रमुख रस्ते बंद झाल्याने शेकडो प्रवासी, नागरिक भाविक व वाहनचालक पाली येथे मध्यभागी अडकून पडले. या सर्वांना श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे मोफत भोजन तर अन् नगरपंचायततर्फे अल्पोपहार देण्यात आला.
अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या आपत्कालीन परिस्थितीची तात्काळ दखल घेत पाली नगराध्यक्ष पराग मेहता यांनी श्री बल्लाळेश्वर देवस्थान अध्यक्ष जितेंद्र गद्रे व देवस्थान प्रशासनाला सहकार्याची विनंती केली. त्यांच्या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या अन्नछत्रालयामार्फत अडकून पडलेल्या सर्व नागरिकांना दुपारच्या मोफत भोजनाची दर्जेदार व्यवस्था करण्यात आली.
देवस्थानच्या या तत्परतेमुळे शेकडो प्रवाशांची भुकेची समस्या दूर झाली. दुसऱ्या बाजूला, अडकलेल्या प्रवाशांना तात्कालिक दिलासा देण्यासाठी नगराध्यक्ष पराग मेहता आणि उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर यांनी स्वतः प्रत्यक्ष जागेवर जात सर्वांना चहा आणि बिस्किटांचे वाटप केले. संकटकाळात प्रशासनाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे अडकलेल्या नागरिकांना मोठा आधार मिळाला. यावेळी पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर या देखील उपस्थित होत्या.
