वाहतुकीला अडथळा, अपघाताचा धोका वाढला
| मुरुड- जंजिरा | प्रतिनिधी।
मुरुड शहरातील कोळीवाड्यालगत असलेल्या एकदरा पुलावर मोकाट गुरांचा कायमस्वरूपी वावर असल्याने हा पूल जणू गुरांचे आश्रयस्थानच बनला आहे. खोरा बंदर, राजपुरी, डोंगरी, माझेरी, आगरदांडा तसेच जंजिरा परिसराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पुलावरून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
अत्यंत वर्दळीच्या या पुलावर दररोज मोठ्या संख्येने मोकाट गुरे उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. विशेषतः सायंकाळच्या वेळी गुरांचे कळप पुलावर ठिय्या मांडून बसत असल्याने दुचाकीस्वार, चारचाकी चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गुरांकडून शिंगे मारण्याचा धोका असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम असूनही संबंधित शासकीय यंत्रणेकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. जंजिरा पर्यटनस्थळाकडे जाणारा हा प्रमुख आणि जवळचा मार्ग असल्याने येथे रात्रंदिवस वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्री पुलावर दिवाबत्तीची सुविधा नसल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडतो. त्यामुळे पुलावर बसलेल्या गुरांचा अंदाज न आल्याने पादचारी त्यांना धडकून पडल्याच्या घटनाही घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दिवसभर चरून आल्यानंतर गुरे पुलावरच रवंथ करत बसतात. त्यांच्या मलमूत्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, स्वच्छतेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी नगरपरिषदेकडून मोकाट गुरांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्याची व्यवस्था होती. मात्र सध्या कोंडवाड्यांची व्यवस्था नसल्याने मोकाट जनावरांचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या मुरुड शहरात या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मोकाट गुरांवर नियंत्रण आणावे, तसेच पुलावर विद्युत किंवा सौरऊर्जेवरील दिवे बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र ही जबाबदारी नगरपरिषदेची की जिल्हा परिषदेची, याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
