| माथेरान | वार्ताहर |
गेली नऊ वर्षे शारलोट तलाव गाळमुक्त न केल्यामुळे पाणीसाठा वाढण्याची क्षमता कमी झाल्याने त्याचा परिणाम पाणी टंचाई स्वरूपात होऊ नये यासाठी हा तलाव लवकरात लवकर गाळमुक्त करून तलावाची पाणी पातळीची क्षमता वाढवून स्वच्छ पाणी पुरवठा माथेरानकरांना करण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिकांमधून करण्यात येत आहे.
सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला पाणी पुरवठा करणारा ब्रिटिशकाळीन शारलोट तलाव गेली नऊ वर्षापासून गाळयुक्त आहे. मागील दोन वर्षांपासून माथेरानमधील अनेक राजकीय नेते मंडळींनी याबाबत पाठपुरावा केला होता.परंतु अधिकाऱ्यांनी मात्र चालढकल करत याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही हा तलाव गाळयुक्त आहे.परिणामी भविष्यात माथेरान पर्यटनस्थळाला पाणी टंचाईची समस्या उद्भवू शकते त्यामुळे माथेरानचे पर्यटन धोक्यात येऊ शकते.असे होऊ नये यासाठी लवकरात लवकर शारलोट तलावातील गाळ काढून पाणी पातळी क्षमता वाढवून स्वच्छ पाणी माथेरानकरांना द्यावे, अशी मागणी माथेरानकरांकडून लेखी स्वरूपात येथील तहसीलदार तथा अधीक्षक दिक्षांत देशपांडे यांच्याकडे केली आहे.
शारलोट तलाव हा जुलै महिन्यातच गाळमुक्त झाला पाहिजे याबाबत मी 26 एप्रिलला पत्रव्यवहार केला होता. पण अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला. मागील वर्षीच तलाव गाळमुक्त झाला असता. पण, यामध्ये राजकीय दबाव होऊन अधिकाऱ्यांनी एकमेकांवर चालढकल करत वेळ घालवली. त्यामुळे, हे भिजत घोंगड तसेच राहीले. पण आत्ता मागील वर्षांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून हा तलाव गाळमुक्त करून येथील माथेरानची पाणी टंचाई दूर करावी.
प्रसाद सावंत