शुक्रवारी चरीच्या संपाचा वर्धापन दिन

नारायण पाटील यांच्या प्रभावशाली नेतृत्वाला अभिवादन; शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या स्मृतींना उपक्रमातून उजाळा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सावकारांच्या मगरमिठीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी चरी येथे ऐतिहासिक संप झाला. नारायण नागू पाटील आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली येथील शेतकरी जागा झाला. संपातील शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शुक्रवारी (दि.27) चरी येथे ऐतिहासिक संपाचा 93 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा सकाळी 10 वाजता होणार आहे. ग्रामपंचायत चरीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांतून नारायण नागू पाटील यांच्या प्रभावशाली नेतृत्वाला अभिवादन केले जाणार आहे.

यावेळी शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, सुधाकर पाटील, शेतकरी नेते राजाराम पाटील, डॉ. पराग पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चरी येथील शाळा ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास स्मारकाला अभिवादन, मानवंदना आणि पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. राजन पांचाळ यांच्या मार्फत पीएनपी कला पथकाद्वारे सादरीकरण केले जाणार आहे. यावेळी चरीच्या संपाचा इतिहास कला पथकामार्फत सांगितला जाणार आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 5 यावेळेत बक्षीस वितरण समारंभ, शेतकी अवजारे वाटप आणि विद्यार्थ्यांना सायकल वितरण केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Exit mobile version