। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चरी येथील शेतकरी संपाचा 91 वा वर्धापनदिन बुधवारी (दि.27) साजरा करण्यात येणार आहे. चरी ग्रामपंचायत आयोजित ऐतिहासिक सोहळा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास होणार आहे.
कोकणात चार शतकांपासून जमीन महसुलाची खोती पद्धत होती. खोत, सावकारांच्या मगरमिठीत सापडलेल्या शेतकर्यांना काढण्यासाठी शेतकर्यांचे नेते नारायण नागू पाटील आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लढा देण्यात आला. चरी गावातील व परिसरातील असंख्य शेतकर्यांनी अन्नाचा एक कण न पिकवता प्रदीर्घ काळ असा खोतांविरोधात संप पुकारला. या संपाची दखल त्यावेळी शासनाला घ्यावी लागली. शोषण करणार्या सावकारांविरोधात पुकारलेला लढा यशस्वी झाला. अखेर सरकारला यावर कायदा करावा लागला. कसेल त्याची जमीन नैसर्गिक न्याय तत्त्व अंमलात आणणारा कुळ कायदा मंजूर करण्यात आला. नारायण नागू पाटील यांच्या प्रभावशाली नेतृत्वाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला पाठिंबा आणि संपातील शेतकर्यांच्या संघर्षाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी चरी शेतकरी संपाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने संविधान विशेष कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.