अनोखी भेट! 40 वर्षांच्या कालावधीनंतरही गुलाबी मैत्री कायम

। रोहा । प्रतिनिधी ।
असं म्हणतात की मैत्रीला वय नसते. एखादी व्यक्ती नक्की कशी आहे, हे केवळ त्याचे मित्रच सांगू शकतात. 40 वर्षांपासून दुरावलेल्या या बालमैत्रिणीची भेट होत नसल्याने आपल्या जुन्या मैत्रिणींची भेट घेण्याची तीव्र इच्छा असलेल्या अनुया देवळे यांनी सर्व बालमैत्रिणींची भेट बडोदा येथे घडवून आणली. या दुर्मिळ भेटीमुळे सर्व मैत्रिणी सुखावल्या असून या भेटीत त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पुरुष वर्ग लग्नानंतर देखील त्याच्या मूळ गावीच बहुतांश वेळा राहत असल्याने त्यांच्या मित्रांच्या भेटी अधूनमधून होत असतात. महिलांना मात्र लग्न झाल्यानंतर सासरी जावे लागत असल्याने अनेक वेळा त्यांना त्यांच्या मैत्रिणींची भेट घेणे अवघड होते. अनुया देवळे पूर्वाश्रमीच्या निलांबरी खटावकर या लग्नानंतर गुजरात बडोदा येथून रायगड जिल्ह्यातील नागाव येथे आल्या. त्यांच्या मैत्रिणींची देखील लग्न होऊन त्या इतरत्र वास्तव्यास गेल्या. यामुळे माहेरी जाऊन देखील मैत्रिणींची भेट होत नव्हती. या मैत्रिणींचे फोन क्रमांक मिळवून अनुया देवळे यांनी पुढाकार घेत बडोदा येथे ही भेट घडवून आणली.

याप्रसंगी शालिनी डोंगरे, रोहिणी डोंगरे, रोहिणी पुराणिक, अंजनी खटावकर, सुरेखा केळकर, मंगल पालकर,भारती आगाशे उपस्थित होत्या. वयाच्या साधारण 20 व्या वर्षी दुरावलेल्या या मैत्रिणी आज साठीला आल्या असल्याने प्रत्येकीला आपल्या बालमैत्रिणींना कधी भेटू असे झाले होते. एकमेकींना भेटल्यानंतर सर्वजणींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. लहानपणी ज्या बागेत या सगळ्या मैत्रीणी एकत्र येत असत त्याच बागेत जात त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. काही तासांसाठी ठरविण्यात आलेली ही भेट पुढे आठवडाभर रंगली होती.

या गुलाबी मैत्रीचे प्रतिक म्हणून सर्व जणींनी गुलाबी साड्या परिधान केल्या होत्या. वयाची साठी पार झाल्यामुळे बहुतेक जणी प्रापंचिक जबाबदार्‍यांमधून मोकळ्या झाल्या आहेत.यामुळे दरवर्षी भेटण्याचे ठरवून या सर्व मैत्रिणींनी एकमेकींचा निरोप घेतला.

Exit mobile version