खुशखबर! नरीमन पॉइंट ते रायगड वीस मिनिटांत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
इकॉनॉमिक टाईम्सच्या आर्किटेक्चर, कन्स्ट्रकशन, इंजिनिअरिंग या गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मुंबईत सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती दिली. तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम देखील 84 टक्के पूर्ण झाले असून नरीमन पॉईंटहून वीस मिनिटांत रायगड जिल्ह्यात पोहचू शकणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय रायगड जिल्ह्यात ग्रोथ सेंटर बांधण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

यावेळी महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन तसेच बांधकाम क्षेत्रातील मनीष गांधी, एसीटेक प्रदर्शनाचे संचालक सुमित गांधी, निरंजन हिरानंदानी, हफिज काँट्रॅक्टर, विकास ओबेरॉय, संदीप रुणवाल, आशीष रहेजा, हॅन्सग्रॉव्ह कंपनीचे ख्रिस्तोफी गोरलॅन, पाओलो रोमानी आदींची उपस्थिती होती.

यापुढे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. आपले सरकार येऊन चार महिने झाले आहेत. इन्फ्राला प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही करीत आहोत. एमएमआरडीएचे एक लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. दरवर्षी 25 हजार कोटींची कामे होतील, अशी योजना तयार करण्यात आली आहे.पुढील 20 वर्षांसाठी एमएमआर प्रादेशिक योजना आणि एमएमआर वाहतूक योजना तयार केली आहे. तसेच राज्य सरकारने एमएमआरडीएला 60 हजार कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे.

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरु
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या गेम चेंजर प्रकल्पाचा पहिला टप्पा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत, हा महामार्ग दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड कॉरिडॉर, जेएनपीटीशी जोडला जाईल असेही ते म्हणाले. सरकार बदलले आहे, आता मुंबईचे रूपही बदलणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील दोन अडीच वर्षात मुंबईतील रस्ते पूर्णपणे कॉँक्रीटचे करण्यात येतील. रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त असतील आणि रस्त्यांमध्ये पाणी तुंबणार नाही असे सांगितले.

5000 किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते
राज्यात 5000 किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते तयार करण्यात येणार आहेत. मुंबई-गोवा ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामाचा डीपीआर तयार झाला आहे. तसेच क्लस्टर विकासाला गती देण्यात येत आहे. मुंबई झोपडीमुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्राच्या मार्गदर्शनामुळे वेगाने प्रगती
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली आहे की, महाराष्ट्रात 2 लाख कोटीचे 225 हून अधिक प्रकल्प मंजूर झाले आहेत. प्रधानमंत्री मोदी यांनी मला आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्राचा पूर्ण पाठिंबा असेल, असे सांगितले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनानंतर प्रथमच महाराष्ट्र सर्व साखळ्या तोडून विजेच्या वेगाने धावत आहे. लोकं उत्साहात आहेत. उत्सव देखील साजरे झाले आहेत. एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे

Exit mobile version