गाळ काढण्यासाठीचा इंधनभार पालिकेवर

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
चिपळूण शहरातील पेठमाप ते उक्ताड दरम्यान जलसंपदा विभागाकडून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. गाळ काढण्यासाठी अलोरे येथील यांत्रिकी विभागाने यंत्रसामग्री उपलब्ध केली आहे. यामुळे यंत्रासाठी लागणार्‍या इंधनासाठी 8 लाख 51 हजारांची तरतूद पालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यापूर्वी शिवनदीतील गाळ काढण्यासाठी 1 कोटीची तरतूद केली होती.
22 जुलै रोजी आलेल्या महापुरात चिपळूणकरांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. यानंतर शहरालगत असलेल्या वाशिष्ठी व शिवनदीतील गाळाचा मुद्दा ऐरणीवर आला. वारंवार मागणी तसेच पाठपुरावा करूनही गाळ काढण्यास सुरुवात होत नसल्याने नागरिकांनी साखळी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. याची दखल घेत, आमदार शेखर निकम यांनी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पेठमाप ते उक्ताड दरम्यान गाळ काढण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
जलसंपदा विभागाकडे खास गाळ काढण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद नाही. त्यामुळे आमदार निकम यांनी जिल्हा नियोजनमधून सुमारे 13 लाखांचा निधी मिळवला होता. त्यांनी पालकमंत्री परब यांच्याकडे आणखी 50 लाखांची मागणीदेखील केलेली आहे. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या कौन्सिलमध्ये त्यास मंजुरी देण्यात आली. दोन दिवसांपासून पालिकेच्या वतीने शहर हद्दीत शिवनदीतील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात केली. चिपळूण शहरात पालिकेच्या ज्या आरक्षित जागा आहेत, ज्या ठिकाणी खोलगट भाग जास्त आहे, अशा जागेत नदीतील काढलेला गाळ, भराव टाकण्यात येत आहे. रस्त्याच्या पातळीपर्यंतच येथे गाळ टाकला जात आहे.
दुसरीकडे बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीत तयार झालेले बेटदेखील काढण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार असलेल्या चेतक कंपनीस दिल्या आहेत. चौपदरीकरणाच्या कामात लागणारा भराव या बेटातून काढण्यात येणार आहे.

Exit mobile version