। चिपळूण । प्रतिनिधी ।
सध्या चिपळूणमध्ये सुरू असलेल्या वाशिष्ठी आणि शिवनदीच्या गाळ उपसा कामाची पाहाणी करून त्याचा आढावा प्रशासकीय अधिकार्यांनी घेतला आहे. गोवळकोट येथील सुवेज कालवा, गणपती विसर्जन घाट, पेठमाप, शिव नदी या ठिकाणी पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिल्या आहेत. तसेच, वाशिष्टी आणि शिवनदीपात्रातून निघत असलेला गाळ नागरिकांनी मोफत न्यावा, असे आवाहन चिपळूण तहसील कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. या गाळासाठी चिपळूण तहसील कार्यालयात संपर्क साधून परवानगी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
2021च्या महापुरानंतर शिवनदीमधील गाळ काढण्याचे काम नाम फाऊंडेशनच्या यंत्रणेने यशस्वीपणे पूर्ण केले. यावेळी गाळ काढण्यासाठी पोकलेन आणि नदीपात्रातील गाळ पुढे सरकवण्यासाठी यांत्रिकी विभागाचा डोजर वापरण्यात आला होता. यावेळी डोजर नसल्याने गाळ सरकवण्याचे काम पोकलेन करत आहे. पोकलेन द्वारे गाळ सरकवण्याच्या कामाला अधिक वेळ लागतो यासाठी लवकरात लवकर डोजर मागवण्याची मागणी चिपळूण बचाव समितीने केली. दरम्यान, येत्या दोन महिन्यांमध्ये उपलब्ध यंत्रणेमधून जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी प्रांत अधिकार्यांतर्फे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार होणार्या कामाची पाहणी चिपळूण बचाव समिती करणार आहे.
यावेळी प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता विनय साळुंखे, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता विपुल खोत, चिपळूण बचाव समितीचे अरुण भोजने, बापू काणे, महेंद्र कासेकर, उदय ओतारी उपस्थित होते.