। गुहागर । प्रतिनिधी ।
गुहागर तालुक्यातील काजुर्ली आडीवाडी येथील एक वीज खांब खालच्या भागातून संपूर्णतः सडला आहे. त्यामुळे तो केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने त्याला लाकडी खांबाचा आधार देण्यात आला आहे. त्यामुळे हा खांब तातडीने बदलावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी चिपळूण वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काजुर्ली आडीवाडी येथील लोखंडी वीज खांब हा खालच्या बाजूने जमिनीजवळ सडलेला असल्यामुळे ग्रामस्थांनी तो लाकडी खांबाने बांधून ठेवलेला आहे. पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात वारा-पाऊस असतो, त्यामुळे केव्हाही पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व अपघाताला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ जबाबदार राहणार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. हा धोकादायक वीजखांब तातडीने बदलावा, अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंता चिपळूण, उप अभियंता गुहागर, शाखा अभियंता आबलोली यांना दिले आहे.