27 किनार्यांवर अंड्यांचे संवर्धन; 54 हजार कासवे समुद्रात परतली
। रत्नागिरी । वार्ताहर ।
रत्नागिरी जिल्ह्यातील किनार्यांवर अंडी घालण्यासाठी येणार्या कासवांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वनविभागाच्या पुढाकारामुळे आणि कासवप्रेमी, तसेच स्थानिक लोकांचा कासवांच्या संवर्धनात सहभाग वाढल्याने जिल्ह्यात कासवांच्या अंड्यांचे संवर्धन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले असून, बाहेर पडणारी पिले लक्षणीय संख्येने समुद्राकडे झेपावत आहेत. गेल्यावर्षी 88 हजार 312 पिल्ले अंड्यांतून बाहेर पडून 48 हजार 740 पिले समुद्राकडे परतली होती. तर, यंदा तब्बल 27 किनार्यांवरील 1 हजार 352 घरट्यांतील 1 लाख 34 हजार 373 अंड्यांतून बाहेर पडलेली 54 हजार 78 पिले समुद्राकडे झेपावली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेला वर्ष 2002 मध्ये कासवांची घरटी आढळली. या संस्थेने वेळास (दापोली) मध्ये कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी 12 किनार्यांवर, दुसर्या वर्षी 13 आणि गेल्यावर्षी 16 आणि यंदा 34 किनार्यांवर अंड्यांचे संवर्धन केले गेले. 2023-24 या वर्षापर्यंत वनविभागाच्या माध्यमातून कासवप्रेमी यांचा पुढाकार आणि स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग यातून संवर्धनाचे कार्य होत होते. गेल्या वर्षापासून (2024-25) येथील कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कासवांचे संवर्धन आणि संरक्षण होत आहे.
गेल्या वर्षापासून जिल्ह्यात कासवांच्या घरट्यांची आणि त्यातील अंड्यांची संख्या लक्षणीय वाढत असून त्याबद्दल सार्यांनाच आश्चर्य वाटत आहे. यावर्षी 54 हजार 78 कासवांच्या पिलांना समुद्रात सोडण्यात आले आहे. यंदा किनार्यांची संख्या आणि घरट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
किरण ठाकूर,
परिक्षेत्र वन अधिकारी, कांदळवन कक्ष, रत्नागिरी