सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी लगीनघाई; गॅबीयनवॉलही 15 जूनपर्यंत करणार पूर्ण
। चिपळूण । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने या कामासाठी लगीनघाई सुरु झाली आहे. धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच, दरडीच्या खालच्या बाजूने गॅबीयनवॉल उभारण्याचे काम 15 जूनपर्यंत सुरु ठेवले जाणार असून या कालावधीत हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अनेक वर्षे रखडले असून विविध टप्प्यांवरील कामे रखडली आहेत. त्यात परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला 22 मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत आहेत. याशिवाय घाटात काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कायम आहे. आता धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जात आहे. या कामामुळे रस्त्यावर येणारी माती आणि भलेमोठ्या दगडांचा धोका काहीअंशी कमी होईल. तसेच, लोखंडी जाळी बसविण्याचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे पूर्णत्वास नेले जाईल. त्यासाठी जागोजागी खडकात व दरडीच्या भागात आत ड्रिल मशीनच्या माध्यमातून लोखंडी सळ्या घुसवले जात आहेत आणि त्यावर जाळी बसवली जात आहे. तसेच, तीन महिन्यांपूर्वी परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबीयनवॉल उभारण्याचे काम देखील जोशात सुरू केले आहे.
दोन ठिकाणी कृत्रिम धबधबे
परशुराम घाटाच्या पायथ्याशी सर्वांचे आकर्षण असलेला सवतसडा धबधबा पावसाळ्यात धो-धो वाहतो. मात्र, आता या घाटात नव्या बांधकामामुळे दोन कृत्रिम धबधबे तयार झाले आहेत. त्याचेही पर्यटकांना आकर्षण वाढणार आहे. मात्र, प्रत्यक्षात हे धबधबे नसून घाटात धोकादायक ठिकाणी वाहून येणारे पाणी टप्प्याटप्प्याने खाली यावे व त्याचा वेग कमी व्हावा, या उद्देशाने ही रचना करण्यात आली आहे.
आता या कामाचा वेग आणखी वाढवला असून धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याचे काम बहुतांशी पुर्ण होत आले आहे. पावसाळ्यापूर्वी लोखंडी जाळी व गॅबीयनवॉल हे दोन्ही काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी या आठवड्यापासून काही प्रमाणात यंत्रणा वाढविण्यात येणार आहे.
पंकज गोसावी,
राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्ग विभाग