| मुंबई | प्रतिनिधी |
पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी दरवाढीसाठी केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार असून, आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवत अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. इंधनटंचाईचे संकट दिसत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक प्रचारात व्यस्त होते, त्यामुळे देशवासियांना मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबईतील टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, 2014 पासून मोदी सरकारने सातत्याने इंधन दरवाढ करून सरकारी व खासगी तेल कंपन्यांना फायदा करून दिला. योग्य नियोजनाऐवजी कंपन्यांचे हित जपल्याने आज इंधन व गॅसटंचाईचा फटका सामान्य नागरिक, हॉटेल व्यवसाय, छोटे उद्योग आणि घरगुती वापरकर्त्यांना बसत आहे.
कांदा प्रश्नावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. दिल्लीला गेलेल्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या हाती “वाटाण्याच्या अक्षता” देण्यात आल्याची टीका करत कांद्याला प्रतिक्विंटल 1500 नव्हे तर्रें 3000 रुपये भाव देऊन नाफेडमार्फत संपूर्ण कांदा खरेदी करावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तणाव निर्माण करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप करत सपकाळ म्हणाले की, प्रत्येक सणात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाच्या भूमिकेमुळे पशुपालन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचाही दावा त्यांनी केला.
इंधन दरवाढ मोदी सरकारचे पाप: हर्षवर्धन सपकाळ
