खेड नगरपरिषदेत इंधन घोटाळा

23 लाख 92 हजार 750 रुपयांचा इंधन व अन्य गैरव्यवहार उघड
फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे अप्पर सचिवांचे आदेश

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

खेड नगरपरिषदेत 23 लाख 92 हजार 750 रुपयांचा इंधन व अन्य गैरव्यवहार केल्याचे चौकशी अहवालात दिसून आल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या अप्पर सचिव प्रतिभा पाटील यांनी दिले आहेत.
इंधन भरतेवेळी संबंधित वाहनांचे लॉगबुक ठेवणे, त्यात इंधन, वाहनाने धावलेले अंतर, प्रयोजन नमूद करणे आवश्यक असतानाही तसे करण्यात आलेले नाही. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लॉगबुक गहाळ केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला असूनतपासणी करून वस्तुस्थिती असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तत्काळ करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.


खेड नगरपरिषदेत डिझेलसह अन्य कामात घोटाळा केल्याच्या तक्रारी सेनेचे गटनेते प्रज्योत तोडकरी यांच्यासह सेना नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्या होत्या. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करुन अहवाल शासनाला सादर केला. दाखल झालेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याचे चौकशीत दिसून आले. 27 ऑगस्ट रोजी शासनाकडे सादर केलेल्या अहवालानुसार नगर परिषदेच्या खर्चातून खासगी वाहनामध्ये जास्त इंधन पुरवठा करून घेण्यात आला होता. नगर परिषदेच्या खर्चातूनच नंबर नसलेल्या खासगी वाहनांमध्येही इंधन पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. पेट्रोल पंपावर स्लिप देण्यापासून इंधनाच्या रकमा प्रदान होईपर्यंतच्या प्रक्रियेतील प्रत्येकाचे नाव व पदनाम, अनियमितता सविस्तरपणे नमूद करून शासनाला तातडीने कळवण्याचे आदेशही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

Exit mobile version