। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर झालेल्या म्युझिक कन्सर्टदरम्यान दोन युवकांचा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आयुष विकी साहित्य हा उल्हासनगरमधील आरोपी फरार झाला होता. रायगड पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी पोलादपूर येथे केलेल्या नाकाबंदीमध्ये गोवा येथे कारने जाणाऱ्या आयुष साहित्यला सापळा रचून पकडण्यात आले.
गोरेगाव येथील म्युझिक कन्सर्टच्या नावाखाली आयोजित कथित रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्जचे अतिसेवन करणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई शहरातील वनराई पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी आयुष विकी साहित्य (वय -24, रा. उल्हासनगर) हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने गोवा येथे पळून जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी रायगड पोलीस अधिक्षक ऑचल दलाल यांना कळविली. यावेळी पोलादपूर येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग जमिनीखालून अंडरपास जात असल्याने आरोपीला या अंडरपासमध्ये आल्यानंतर अन्यत्र कोठे पळून जाणे अशक्य असल्याची भौगालिक परिस्थिती लक्षात घेऊन रायगड पोलीस अधिक्षक ऑचल दलाल यांनी पोलादपूर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांना मार्गदर्शन करून संयुक्तपणे पोलादपूर येथे नाकाबंदी आणि सापळा रचला. या सापळयात फरार आरोपी आयुष विकी साहित्य हा सहज अडकला.
आरोपी आयुष साहित्य याने एक्सटसी या नावाचा अंमली पदार्थ गोरेगावच्या म्युझिक कन्सर्टमध्ये वितरित केल्याचे पोलीस तपासात तसेच मृतांच्या शवविच्छेदन आणि फोरेन्सिक अहवालात निष्पन्न झाले आहे. आरोपी आयुष साहित्य याला (एमएच 05 जीडी 5398) मारूती सुझुकी कारसह पकडून पोलादपूर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर झाडाझडती घेऊन ताबडतोब मुंबई शहरातील वनराई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद गावडे आणि सहकारी यांनी केली. याबद्दल पोलादपूर पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.






