अवघ्या पाच मिनिटांत बुकिंग फुल्ल

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाडया चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. या विशेष गाड्या सुरु होताच पुन्हा एकदा अवघ्या काही मिनिटात बुकिंग फुल्ल झाल्याचे दिसून आले. आता वाढती मागणी पाहता रेल्वे आणखी गाड्या सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष गाड्यांच्या आरक्षणास 21 जुलैपासून सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी आरक्षण सुरू होताच आठ ते दहा मिनिटातच आरक्षण फुल्ल झाले होते. यावेळी तिकीट आरक्षणात काळाबाजार सुरु आहे का? असा सवाल उपस्थित केला जात होता. आता पुन्हा आरक्षण सुरु झाल्यावर बुकिंग फुल्ल झाले आहे.

258 स्पेशल ट्रेनचे बुकिंग फुल्ल
गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येत असतात. साधारण गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधीपासून कोकणातील मूळगावी जाण्याचे कोकणवासीयांचे नियोजन असते. गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वे 202 विशेष गाड्या तर पश्‍चिम रेल्वेकडून 56 गाड्या सोडण्यात येणार आहेत. गणपती स्पेशल गाड्या बुकिंग पुन्हा सुरु झाले होते. मात्र, अवघ्या पाच मिनिटांत 258 गणपती स्पेशल ट्रेनचे बुकिंग फुल्ल झाले आहे. वेटिंग लिस्ट 700 ते 800 च्या घरात पोहोचली आहे.
Exit mobile version