विजेअभावी नळ कोरडेठाक!

विद्युत जोडणीसाठी तीन कोटींचा निधी रखडला; सहा तालुक्यांतील 25 योजना ठप्प

| रायगड | प्रमोद जाधव |

जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली; मात्र विद्युत जोडणीअभावी नळ कोरडेच आहेत. रोहा, महाड, पोलादपूर, मुरूड, म्हसळा आणि माणगाव या सहा तालुक्यांतील 25 योजना विजेअभावी ठप्प आहेत. विद्युत जोडणीसाठी तीन कोटी सात लाख 63 हजार 791 रुपयांचा निधी आवश्यक असताना जिल्हा प्रशासनाकडून तो उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे योजना पूर्ण होऊनही हजारो नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

वाढते पर्यटन आणि औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई गंभीर बनत आहे. जानेवारीपासूनच पाणीकपातीचे संकट निर्माण होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत रायगडमधील 809 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पाच हजार तीन गावे-वाड्यांमधील 16 लाख 64 हजार नागरिकांसाठी नळपाणी योजना राबविण्यात आल्या. मात्र, नियोजनातील त्रुटींमुळे या योजनांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

सहा तालुक्यांतील 25 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यात रोहा चार, म्हसळा तीन, पोलादपूर सहा, महाड चार, माणगाव पाच आणि मुरूडमधील तीन योजनांचा समावेश आहे. मात्र, पाणी उपसण्यासाठी आणि घरापर्यंत पोहोचविण्यासाठी रोहित्र, विद्युत खांब आणि तारांची जोडणी आवश्यक आहे. त्यासाठी तीन कोटी सात लाख 63 हजार 791 रुपयांचा निधी हवा आहे.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हा नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे निधीची मागणी केली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही निधी मिळालेला नाही. परिणामी, पूर्ण झालेल्या योजनांचा उपयोगच होत नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विद्युत जोडणीसाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे निधीची मागणी केली आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.

– मोहन सरवदे, कार्यकारी अभियंता,

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

Exit mobile version