। अलिबाग । वार्ताहर ।
संपूर्ण महाराष्ट्रात रागडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींमुळे अनेक ठिकाणी विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आता एकत्र आले आहेत. तर, सोबत असणारे विरोधक झाले आहेत. अशीच परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची झाली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरुन या दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेला आहे. गोगावले व तटकरे यांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. एरव्ही एकमेकांकडे ढुंकूनही न बघणारे गोगावले व तटकरे पालकमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी याकरिता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी शुक्रवारी (दि.28) एकाच कार्यक्रमात उपस्थित होते. त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले कट्टर विरोधक भाजपपुढे नतमस्तक झाल्याची टीका स्थानिकांनी दबक्या आवाजात केल्याचे दिसून आले.
जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप मिटलेला नाही. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड किल्ला दौर्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालकमंत्री कोण होणार, हे ठरविण्याची ताकद भाजपमध्ये आहे. आ. भरत गोगावले व आ. अदिती तटकरे या दोघांनीही एकाच कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम किल्ले रायगडावर 12 एप्रिल रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दिग्गज मंत्र्यांनी पाचाडसह किल्ले रायगडला भेट दिली. त्यांनी तेथील सोयी-सुविधा तसेच सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेतला.
या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर आणि परिसरामध्ये प्रशासनाकडून केल्या जाणार्या तयारीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, विधान परिषदेतील भाजपच गटनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच विविध विभागांचे अधिकारी किल्ले रायगडावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, त्या ठिकाणाची संपूर्ण पाहणी करून अधिकार्यांना त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना करुन फेरबदल करण्यास सांगितले. तत्पूर्वी, सर्व मंत्र्यांनी पाचाड येथील राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन समाधीस्थळाजवळ सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. रायगड प्राधिकरण आणि भारतीय पुरातत्व विभागाच्यावतीने या ठिकाणी दोन वर्षांहून अधिक काळ विविध कामे संथगतीने सुरू आहेत. येथील सुरु असलेल्या कामाची पाहणीदेखील संबंधितांनी केली.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अद्यापही रिक्त आहे. मंत्री तटकरे आणि मंत्री गोगावले यांच्यामध्ये कमालीची स्पर्धा आहे. दोन्ही नेत्यांना रायगड जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. यासाठी पालकमंत्रीपदी आपलीच वर्णी लागावी यासाठी दोन्हीकडून खटाटोप सुरु आहे.