विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात; तीन वर्षांपासून उर्दू शाळांवर शिक्षक नाहीत

शिक्षकांची एकवीस पदे रिक्त
| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून उर्दू माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याची धक्कादायक व संतापजनक माहिती प्राप्त झाली आहे. तालुक्यात तीन केंद्रांमधून असलेल्या एकूण त्र्याहत्तर मंजूर पदांपैकी बावन्न पदे कार्यरत असून, एकवीस पदे रिक्त आहेत. दरम्यान, या प्रकाराने तालुक्यातील सातशेपेक्षा जास्त उर्दू भाषिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे.

यासंदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तालुक्याच्या तीन केंद्रांमधून असणार्‍या या उर्दू माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या सुमारे तीसपेक्षा जास्त असून, यामध्ये मंजूर उपशिक्षकांची पदे साठ असताना, प्रत्यक्षात एकोणपन्नास कार्यरत असून, रिक्त पदांची संख्या अकरा आहे. तर, पदवीधर शिक्षकाची मंजूर पदे तेरा असून, केवळ तीन पदे कार्यरत आहेत. अकरा पदे रिक्त असल्याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाकडूनच देण्यात आली आहे. यासंदर्भात प्राथमिक स्तरावर करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान तालुक्याच्या मुमुर्शी, दासगाव व सव आदी शाळांमधून शिक्षक नसल्याने अन्य शाळांतील उर्दू भाषिक शिक्षकांना कामगिरीवर या संबंधित शाळांवर पाठवण्यात आल्याची माहिती महाड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली.
यासंदर्भात करण्यात आलेल्या पाहणीमध्ये तालुक्याच्या उर्दू भाषिक तीन केंद्रांतर्गत दासगाव कांबळे व तुडिल या ठिकाणी प्रत्येकी दोनशे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिक्षकांची पाठ
मागील दोन वर्षे जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा बहुतांश काळ बंद होत्या. मात्र, त्यानंतर चालू वर्षी सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षापासून तालुक्यातील अनेक प्रमुख गावांतील उर्दू भाषिक शाळांमध्ये शिक्षकच येत नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
पुढील पिढीतील सुमारे सातशेपेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींचे शैक्षणिक भवितव्याबाबत जिल्हा शिक्षण प्रशासन मंडळाकडून दिसून येत असलेला दुर्लक्षितपणा व अनास्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी ठरणार आहे. शासनाने यासंदर्भात उर्दू भाषिक विद्यार्थ्यांकरिता शिक्षकांची व्यवस्था कामगिरी तत्त्वावर करावी, अशी मागणी महाड तालुक्यातील मुस्लीम भाषिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संपूर्ण तालुक्यातील उर्दू भाषिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक पदे रिक्त पदे आहेत. परंतु, हा प्रश्‍न केवळ महाडपुरता मर्यादित नसून, जिल्हास्तरावरदेखील हीच समस्या आहे. याबाबत वरिष्ठांकडे नव्याने शिक्षक नियुक्त करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

– सौ. पालकर, अधिकारी, पं.स. शिक्षण विभाग



Exit mobile version