। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन पंचायत समितीचे नियमित गट शिक्षणाधिकारी पद गेल्या पाच वर्षांपासून रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. पाली पं.स.चे गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी श्रीवर्धन येथील गट शिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार 6 जून 22 पासून स्वीकारला आहे. ते मात्र आपल्या कामांत अत्यंत उत्साही आणि तळमळीने काम करण्याची इच्छा असल्याचे दिसून आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीवर्धन तालुक्यात जि.प.च्या शाळांची संख्या 98 असून त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3183 आहे तर शिक्षक संख्या 198 आहे. केंद्र प्रमुखांच्या दहा पदांपैकी नऊ पदे रिक्त आहेत. तसेच शिक्षण विस्तार अधिका-यांच्या दोन मंजूर पदांपैकी दोन्ही रिक्त आहेत.
तालुक्यात खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या 30 आहे. नवीन शैक्षणिक वर्षात जि.प. च्या प्राथमिक. शाळा 15 जूनपासून नियमित सुरु झाल्या असून 13 व 14 जून असे दोन दिवस स्वच्छता इत्यादि प्रकारची शाळापूर्व तंयारी करण्यात आली. तालुक्यातील जि.प.प्राथमिक.शाळामध्ये शिकविणा-या बहुसंख्य शिक्षकांचे लसीकरण (बुस्टर डोस) पूर्ण झालेले आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी केंद्र प्रमुखांच्या दोन सभा घेण्यात आल्या असून विशेष बाब म्हणजे शिक्षण हक्क कायद्याची सविस्तर माहिती शिक्षक कार्यशाळेत देण्यात आली आहे. जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य शाळांमधून ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनही देण्यात आल्याचे समजले. महत्वाचे म्हणजे ‘शिक्षक आमचा मानबिंदू: विद्यार्थी आमचा केंद्रबिंदू ‘ हे साबळे यांचे ब्रीदवाक्य आहे आणि त्यानुसारच काम करण्याची त्यांची तळमळ दिसून आली.