। पनवेल । प्रतिनिधी ।
मागील आंदोलनावेळी निर्माण झालेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती पाहता 24 जून रोजी होणार्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून गुरुवारपासूनच बंदोबस्त लावण्यात आला आहे. नवी मुंबई नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळास स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव सिडकोने पारित करून राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबई,उरणमधील प्रकल्पग्रस्तांनी ही मागणी लावून धरली असून गेली दोन वर्षे हा लढा सुरू आहे. यापूर्वी साखळी आंदोलन, भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शासनदरबारी मागणीची दखल घेतली न गेल्याने 24 जून रोजी सिडकोला घेराव घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय समितीने घेतला आहे. यापूर्वीही झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवले होते. त्याप्रमाणे यावेळीही नाकेबंदी करीत मोर्चेकरांना रोखण्याची नियोजन पोलिसांनी केले आहे. मोर्चात या चार जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना सिडको भवनपर्यंत पोहचू न देण्याचे ठरवण्यात आले आहे.
सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार असून यात 550 महिला पोलीस, 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 20 पोलीस निरीक्षक यांच्यासह एक राखीव पोलीस दलाची तुकडी व दंगल नियंत्रक वाहन व रुग्णवाहिका असणार आहे. गुरुवारपासूनच हा बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस रात्रीपासून आंदोलकांची धरपकड करणार आहेत.