जि.प. भरतीत अर्ज करायचाय? मग नक्की वाचा

रायगडात गट ‘क’मधील 21 संवर्गातील 840 पदे भरणार

| रायगड | प्रतिनिधी |

ग्रामविकास विभागांतर्गत रायगड जिल्हा परिषदांमधील गट ‘क’मधील सरळसेवेची तब्बल 840 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा शुल्काचा विषय ऐरणीवर आला असून एका उमेदवाराने पात्र ठरणार्‍या तीन ते पाच संवर्गासाठी अर्ज करण्याचा विचार केल्यास त्याला तब्बल पाच हजार रुपयांचे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. सामान्यांना हे शुल्क परवडणारे नसून शासनाने लूट मांडल्याची टीका होत आहे. विशेष म्हणजे, रायगडात 840 पदे असे राज्यात 19 हजार पदांसाठी लाखोंच्या घरात अर्ज येणार असून शासनाकडे त्यातून कोट्यवधींचा महसूल जमा होणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोनाची साथ यामुळे जिल्हा परिषदेची पदभरती रखडली होती. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 840 पदांसाठी जाहिराती येण्यास सुरुवात झाली आहे. जाहिरातीतील सूचनेनुसार सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय ऑनलाईन परीक्षा होणार आहे. यासाठी उमेदवाराने एकाच पदाकरिता जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करून अनावश्यक खर्च टाळावा अशी सूचना दिली आहे. मात्र, एकापेक्षा जास्त पदांसाठी एखादा उमेदवार पात्र असल्यास त्याला सर्व ठिकाणी अर्ज करणे भाग आहे. अन्य परीक्षांप्रमाणे जिल्हा परिषदेमध्येही खुल्या वर्गाकडून एक हजार तर आरक्षित वर्गाला 900 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे जास्त पदांसाठी अर्ज करणार्‍या एका उमेदवाराला चार ते पाच हजार रुपयांचा भुर्दंड बसणार असल्याने शासनाने शुल्क कपात करावी, अशी मागणी होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही या विषयाची अनेकदा चर्चेला आला. मात्र, शासनाने शुल्क कमी करण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी होणार आहे.

सरळसेवा भरतीसाठी निवडण्यात आलेल्या कंपन्यांकडून मागील काळात मोठया प्रमाणात घोटाळे करण्यात आल्याने राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब, क आणि ड संवर्गातील पदांच्या भरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची निवड केली. या कंपन्या जिल्हा परिषदेची परीक्षा घेणार आहेत. कंपनीच्या दरपत्रकानुसार पाच लाखांहून अधिक विद्यार्थी असल्यास 495 रुपये प्रतिविद्यार्थी शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय संबंधित प्रशासकीय कार्यालयाचा खर्च भागवण्यासाठी कंपन्यांनी दिलेल्या दरामध्ये 15 टक्के कर अशी वाढ करून शुल्क आकारले जावे असे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे 495 रुपयांत 15 टक्के रकमेची वाढ केली तरी हे शुल्क जास्तीत जास्त 550 रुपयांपर्यंत असायला हवे. जिल्हा परिषदेसाठी लाखोंच्या घरात अर्ज येणार आहेत. त्यामुळे शासन दुप्पट शुल्क आकारून लूट करीत असल्याचा आरोप होत आहे.

रायगड जिल्हा परिषदेमध्ये गट क च्या 21 संवर्गातील 840 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक 1, आरोग्य सेवक पुरुष 47, आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी 103, आरोग्य परिचारिका 352, औषध निर्माण अधिकारी 21, कंत्राटी ग्रामसेवक 75, कनिष्ठ अभियंता बांधकाम 60, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 1, कनिष्ठ लेखा अधिकारी 4, कनिष्ठ सहाय्यक 56, कनिष्ठ सहाय्यक लेखा 4, मुख्य सेविका 8 , पशुधन पर्यवेक्षक 30, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3 , लघुलेखक उच्च श्रेणी 1, लघुलेखक निमन श्रेणी 1, व्रुष्ठ सहाय्यक 12, वरिष्ठ सहाय्यक लेखा 5 , विस्तार अधिकारी कृषी 4, विस्तार अधिकारी सांख्यिकी 6 आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 46 पदांचा समावेश आहे.

Exit mobile version