अलिबाग पोलिसांना खुले आव्हान
। अलिबाग । प्रतिनिधी ।
नागाव येथील साताड बंदरानजीक एका अज्ञात महिलेचा मृतदेह 4 एप्रिल 2022 रोजी सापडला होता. कोणत्यातरी धारदार हत्याराने तिचा खून झाल्याचे डॉक्टरांच्या अहवालानुसार निष्पन्न झाले होते. मात्र, नागावाचे खूनप्रकरण आजही गुलदस्त्यात असून, महिलेची हत्या करणारा मोकाटच असल्याने अलिबाग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या खुनाच्या मुळापर्यंत पोहचण्यास पोलिस अपयशी ठरल्याचे चित्र यावरुन दिसून येत आहे.
नागाव हे पर्यटनदृष्टीने महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. नागाव येथील साताड बंदर कायमच गजबजलेले असते. पर्यटकांसह स्थानिकांची वर्दळ याठिकाणी नेहमीच असते. या बंदरानजीक बीट हेवन कॉटेजच्या मागील भागात हिरानंदानी प्लॉटच्या लगत असलेल्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला झुडपात 4 एप्रिल 2022 रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह स्थानिकांना दिसून आला. तिचा चेहरा व शरीर कुजलेल्या अवस्थेत होते. जिल्हा रुग्णालयाच्या सल्ल्यानूसार मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये महिलेच्या घशावर कोणीतरी धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकिय अहवालानुसार अलिबाग पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक शैलेश सणस करीत होते.
वेगवेगळ्या पध्दतीने गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. मात्र, खून्याचा शोध पोलिसांना लागला नाही. त्यानंतर सणस यांची बदली झाली. त्यांच्यानंतर संजय पाटील व बांगर यांची बदली झाली. आता किशोर साळे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या तीन वर्षाच्या कालावधीत तीन ते चार अधिकारी बदलून गेले. परंतु महिलेचा खुन केलेल्या मारेकर्याचा तपास काही त्यांना लागला नाही. नागाव येथील महिलेच्या खुनाचा तपास आजही गुलदस्त्यात आहे.
ही महिला नक्की कोण होती, तिला मारणारा मारेकरी कोण, तो आजही मोकाट का आहे, अशा अनेक प्रकारचे प्रश्न जनमानसातून उमटले जात आहेत. तीन वर्षात या गुन्ह्याचा तपास लागला नसल्याने त्याचा अहवाल तयार करून दंडाधिकारी म्हणून अलिबागचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नागाव येथील साताड बंदरानजीक एका महिलेचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. वैद्यकिय अहवालानुसार धारदार शस्त्राने वार केल्याचे निष्पन्न झाल्याने खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करण्यात आला होता. मात्र, आरोपी सापडला नाही. त्यानंतर बदली झाली.
शैलेश सणस
पोलीस निरीक्षक (तत्कालीन )
अशी होती मृतदेहाची अवस्था
नागाव येथील साताड बंदरानजीक एका कॉटेजच्या लगत झुडपात एका अज्ञात महिलेचा मृतदेह तीन वर्षापुर्वी सापडला होता. अंदाजे त्या महिलेचे वय 45 वर्षे होते. निळसर रंगाचा टॉप घातलेला, सफेद रंगाची नक्षी असलेला निळसर रंगाचा पायजमा घातलेला, अंगावर गुलाबी रंगाची ओढणी असे तिचे वर्णन होते. शरीर कुजलेले असल्याने त्यावर अळ्या पडल्या होत्या. त्यामुळे चेहरा ओळखता येत नव्हता.
नागाव येथील एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदनानंतर वैद्यकिय अधिकार्यांच्या अहवालानुसार तिचा घशावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले. अलिबाग पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत होते. मात्र, तपासात काहीच सुगावा लागला नाही, अशी माहिती उपलब्ध होत आहे.
विनीत चौधरी,
उपविभागीय पोलिस अधिकारी, अलिबाग