गाढी नदी प्रदूषणाच्या विळख्यात


| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील शिवणसई येथील गाढी नदीपात्रात बॉयलर कोंबड्यांची घाण, पिसे, गोवंशाचे अवशेष आणि अन्य कचरा टाकण्यात येत असल्याने नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


21 ऑक्टोबर रोजी शिवणसई येथील गाढी नदीच्या पुलाखाली तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची घाण, पिसे आणि गोवंशाचे अवशेष टाकल्याचे आढळून आले. या नदीच्या पाण्याचा वापर स्थानिक नागरिक कपडे धुण्यासाठी करतात. तसेच लहान मुले येथे आंघोळीसाठी येतात. परिसरातील मच्छीमारही नदीत मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, नदीपात्रात टाकण्यात येणाऱ्या घाणीमुळे या सर्वांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नदीच्या पाण्यात घाण मिसळल्याने पाणी दूषित झाले असून, परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, नदीतील मासे मृत होत असल्याचा आणि मासेमारीची जाळी खराब होत असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, मच्छीमारांच्या रोजगारावरही संकट निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी बेकायदा कत्तलखाने आणि बॉयलर कोंबड्यांचे विक्रेते नदीपात्रात हा कचरा टाकत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी, पंचनामा करावा आणि नदीपात्राची तातडीने स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version