पिडीतेला न्याय मिळेपर्यंत गेल बंदच; ग्रामस्थांचा निर्धार

पोलिस अधिक्षकांच्या बैठकीत ग्रामस्थ आक्रमक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चिंचोटी येथील तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करुन तिला ठार मारण्याच्या प्रयत्न करण्याची घटना घडल्यानंतर ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. यासंदर्भात पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत देखील ग्रामस्थ आपल्या भुमिकेवर ठाम होते. यावेळी पिडीतेला न्याय मिळेपर्यंत गेल कंपनीचे काम चालु देणार नाही या भुमिकेचाच पुर्नरोच्चार करण्यात आला. तसेच परप्रांतिय भैय्यांना काम करण्याचा तीव्र विरोध करण्यात आला. संबंधीत पिडीतेला गेलकडून 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली असून यासंदर्भात कंपनी प्रशासनाला 24 तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

तरुणीचा विनयभंग व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या चार दिवसांपासून चिंचोटी परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. तरुणीला न्याय मिळावा यासाठी कुदेपासून बेलकडेमधील असंख्य ग्रामस्थ व महिला पोलीस प्रशासन व गेल कंपनी प्रशासनाकडे दाद मागत आहे. ग्रामस्थांचा वाढता संताप पाहता परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पुढाकार घेत जातीने लक्ष देण्यात सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे तसेच अलिबाग तालुका शेकाप महिला आघाडीच्या सदस्या तथा ग्रा. पं. सदस्या देवयानी पाटील, अंजली ठाकूर, पोलीस पाटील वैशाली पाटील, अॅड. मयुरी ले पाटील, भाविन लोगडे, प्रणिता पाटील, तसेच शेकाप कार्यकर्ते संजय पाटील, गिरीष तेलगे, रामचंद्र पाटील, मोहन धुमाळ, महेश झावरे, बाद सुभाष वागळे, काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, समाज कल्याण विभागाचे माजी सभापती दिलीप भोईर, पंचायत समिती माजी सदस्य श्रीधर भोपी, प्रकाश गायकर, अ‍ॅड. राकेश पाटील आदींसह गेल कंपनीचे अधिकारी जितीन सक्सेना, अनुप गुप्ता तसेच ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत  भैया हटाव मागणी जोर धरत असताना, पिडीत मुलीचे समुपदेशन करणे. तिला उभारी देण्यासाठी कंपनीकडून मदत देणे. तसेच आरोपींविरोधात कठोर कारवाई करणे व स्थानिकांना प्राधान्याने कंपनीत सामावून घेणे अशा अनेक प्रकारची मते वेगवेगळ्या मंडळींनी मांडली. सर्वांची मते ऐकून घेतल्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले, कंपनीत कामाला असलेल्या सर्व बाहेरील कामगारांची पोलीस पडताळणी केली जाणार आहे. त्यांची सर्व कागदपत्रे तपासले जाणार आहेत. गुन्हेगारी वृत्तीचे असलेल्या कामगारांवर कारवाई केली जाणार आहे. त्या कामगारांना कंपनीत कामाला घेऊ नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ठेकेदाराने कामगारांची नेमणुक केली आहे. त्या एजन्सीला ब्लॅक लिस्टवर टाकण्याबाबत कंपनीला पत्र देण्यात आले आहे. तसेच ठेकेदाराने नेमलेल्या कामगारांचे प्रवेश पत्र रद्द करावे त्याची अंमलबजावणी तातडीने करावी अशी सुचना कंपनी प्रशासनाला दिल्या आहेत. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी कंपनीबाबत वेगळी नियमावली बनविण्यात आली आहे. ठेकेदाराने काय काळजी घ्यावी. त्याचे पालन कशा पध्दतीने करावे याची सक्त ताकीद दिली जाणार आहे. ज्या ठिकाणी भाड्याने राहत आहेत. त्या कामगारांचे भाडेकरार पत्र झाले आहे, का याचीदेखील पडताळणी केली जाणार आहे. भविष्यात कामगारांकडून काही गैरप्रकार घडल्यास त्यांच्याविरोधात ठोस कारवाई केली जाणार आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. कंपनीच्या आवारात उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये पुर्णवेळ कर्मचार्‍यांची नेमणुक केली जाणार आहे, असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.या बैठकीत सदर पीडितेचा जीव वाचविणारे राम पाटील व जयवंत पाटील यांचे विशेष कौतुक करीत योग्य सन्मान करण्यात येईल, असे घार्गे यांनी सांगितले.

पिडीतेच्या मदतीसाठी कंपनीला 24 तासाचा अल्टिमेटम
गेल कंपनीतील कंत्राटी कामगारांकडून झालेल्या कृत्याबाबत पिडीत तरुणीला आर्थिक मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. कंपनी प्रशासनाने येत्या 24 तासात त्यावर निर्णय घेण्याबाबत सुचना दिली आहे. यावर 22 मार्च रोजी पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या दालनात प्रमुख मंडळीच्या व कंपनीच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. पिडीतेला मदतीसाठी 24 तासाचा अल्टिमेटम घार्गे यांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे.

चिंचोटी येथील तरुणीवर झालेल्या कृत्याबाबत संबंधित गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस दलाकडून ठोस कार्यवाही करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास शास्त्रशुध्द पध्दतीने व्हावा यासाठी वरिष्ठ अधिकारी म्हणून महिला पोलीसांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतत्रं पथक नेमण्यात आले आहे. गुन्हेगारांविरोधात ठोस पुरावे गोळा करून त्यांच्याविरोधात दोषारोप पत्र न्यायालयात लवकरात लवकर दाखल करण्याचा प्रयत्न केला जाईल. या गुन्हेगारांना आजन्म कारावास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर पावले पोलीस दलाकडून उचलण्यात आली आहेत.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक
Exit mobile version