गंभीर भारताचा नवीन प्रशिक्षक?

अधिकृत घोषणा होणे बाकी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

मागील काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक. विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा लवकरच प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले आहेत. परदेशी शिलेदारांपासून भारतातील काही माजी खेळाडूंची नावे या पदासाठी घेतली जात आहेत. अशातच गौतम गंभीरला या पदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरच्या संघाने आयपीएल 2024 चा किताब जिंकला. खरे तर केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह आणि गौतम गंभीर यांची मैदानात काही मुद्द्यांवर चर्चा झाली. ही चर्चा प्रशिक्षकपदाबद्दल असल्याचे कळते. एका वृत्तानुसार, आयपीएलमधील एका संघाच्या मालकाने गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल यावर शिक्कामोर्तब केला आहे. आता केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

Exit mobile version