कुरुळमध्ये जुगार अड्डा तेजीत; अलिबाग पोलिसांचे दुर्लक्ष


। अलिबाग । प्रतिनिधी ।

कुरुळ गावानजीक काही बाहेरील धनदांडग्यांच्या कृपेने जुगार क्लबचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. या अवैध धंद्यामुळे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. जुगाराच्या आहारी जाऊन तरुणाई बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील अलिबाग पोलिसांकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कुरुळमध्ये शेतीसह वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून येथील मंडळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. काही महिला खाडीतून कालवे आणून ते विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे कुरुळ गावाची एक वेगळी ओळख आहे. कष्टकर्‍यांचा गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, याच गावाच्या नजीक काही बाहेरील धनदांडग्यांनी जुगाराचा धंदा खुलेआमपणे सुरू ठेवला आहे. ज्या ठिकाणी धंदा सुरु आहे, त्या परिसरात महिलांची कालवे गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्याचबरोबरच जुगार अड्ड्यापासून काही अंतरावर शाळादेखील आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्‍नदेखील निर्माण झाला आहे. दिवसा-रात्री जुगार अड्डा चालत असल्याने त्याचा परिणाम काही कुटुंबांवरही होत आहे.

अलिबाग पोलिसांना या अड्ड्याबाबत माहिती असतानादेखील त्या धंद्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. पोलीस फक्त बघ्याची भूमिका का घेत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. बाहेरील काही मंडळींकडून या परिसरात खुलेआमपणे धंदे चालविले जात असल्याने नागरी सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

कुरुळ येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्याला कोणतीही परवानगी दिली नाही. मात्र, तेथील पाहणी करून महिला व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित अड्ड्यावर कारवाई केली जाईल.

संदीप बागुल,
पोलीस निरीक्षक,
अलिबाग
Exit mobile version