चिठ्ठी बंद, मोबाइल मटका मात्र सुरूच

पोलीस अधीक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी आपल्या पदाची सूत्रे हातात घेतल्याबरोबरच सर्व अवैध धंद्यांना चाप लावण्याची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये अवैध मटका, जुगार, ऑनलाइन गेम, चक्री जुगार यांसह अनेक अवैध धंद्यांना त्यांनी जिल्ह्यात बंदी आणली आहे. तर, जिल्ह्यातील अवैध मटका व्यवसाय तर हद्दपार करण्याचे मनावर घेतले आहे. लेडी सिंघम म्हणून आँचल दलाल यांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत असतानाच जिल्ह्यात मटक्याच्या टपऱ्या बंद झाल्या असल्या तरी अजूनही काही ठिकाणी चोरी छुपे मोबाईलवर घेतला जाणारा मटका मात्र सुरूच आहे.

यामध्ये जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठणे शहराचाही समावेश असून, येथील या चोरी छुपे मोबाईल मटका व्यवसायाला नक्की कुणाचा आशीर्वाद आहे, याची चर्चा होत आहे. त्यामुळे आँचल दलाल यांच्या डोळ्यात नक्की कोण धूळफेक करीत आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आँचल दलाल आता याप्रकरणी नक्की कोणती भूमिका घेतात व काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मटका खुलेआम सुरू असताना चिठ्ठीवर घेतला जात होता. आता पद्धत तीच आहे, पण चिठ्ठीऐवजी फक्त मोबाइलवरून मटक्याचा बिझनेस सांगितला जातो. दुसऱ्या दिवशी मटका कंपनीची व्यक्ती फोनवरू अज्ञात ठिकाणी मटका घेणाऱ्याला बोलावते आणि आदल्या दिवशीच्या बिझनेसचे पैसे घेऊन जाते.
मुंबई-कल्याणचा ओपन-क्लोजचा आकडा घेतल्यानंतर ठरलेल्या वेळेच्या आत सर्व आकड्यांचा हिशेब द्यावा लागतो. पूर्वी एक व्यक्ती दुचाकीवरून येऊन सर्व चिठ्ठ्या घेऊन जात असे. त्यानंतर आकडे जाहीर व्हायचे. आता मटका घेणारे आपापल्या ओळखीच्या लोकांचेच मटका घेत आहेत. पैशाची घेवाण-देवाण मात्र लपूनछपून सुरू आहे. मोबाइलचा नवीन नंबर किंवा नवीन चेहरा दिसला की मटका बंद असल्याचे सांगितले जाते. पूर्वी मटका खुलेआम टपऱ्यांमध्ये घेतला जात होता. आज ते प्रमाण कमी झाले आहे. सध्या कुणाच्या तरी घरातून, हॉटेल, चहाची टपरी, कोल्ड्रिंक्सची दुकाने, रिक्षांमध्ये, चालता फिरता तो सुरू आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात मटका मोबाइलवरून घेतला जात आहे.

पूर्वी मटका टपरीबद्दल वर्तमानपत्रात फोटोसहित बातमी प्रसिद्ध केले की, केवळ संबंधित टपरीवरच किरकोळ कारवाई व्हायची. पुन्हा आठवड्याभराने जैसे थे स्थिती असायची. मात्र, त्यावेळी इतर टपऱ्यांना धक्का लागत नव्हता. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सुरुवातीलाच जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रायगड जिल्ह्यात अवैध धंदे चालणार नाही, हे खडसावून सांगितले. तेव्हापासून मटका, जुगार क्लब आणि हातभट्टी विक्री बंद झाली. नंतर ही हातभट्टी दारू विक्री पुन्हा सुरू झाली. चिठ्ठीद्वारे चालणारा मटका बंद झाला, पण मोबाइल मटका सुरू झाला, अशी भयानक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे

Exit mobile version