| अलिबाग | प्रतिनिधी |
दहा दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनानंतर साखर चौथच्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहे. दीड दिवसाच्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी जोमाने तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात साखर चौथच्या 874 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना ठिकठिकाणी केली जाणार आहे. त्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने 377 व घरगुती 467 मूर्तींचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत भक्तांना गणेशमुर्ती तयार करून देताना मूर्तीकारांना त्यांच्या घरी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे दहा दिवसाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर साखरचौथ गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरु करण्यात आली. पूर्वी मोजकीच मंडळी गणेशमूर्ती आणत होते. मात्र दिवसेंदिवस साखर चौथ गणेशमूर्ती प्रतिष्ठापनाची क्रेझ वाढत आहे. अलिबागसह पनवेल, रोहा, पेण या तालुक्यांमध्ये ही क्रेझ वाढली आहे.
जिल्हाभरात 874 ठिकाणी मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. वेगवेगळ्या मंडळाबरोबरच अनेक ठिकाणी घरगुती गणेशमुर्ती विराजमान होणार आहेत. त्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. 3 ऑक्टोबरला या गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाईल. या दीड दिवसाच्या कालावधीत भजन, आरती, तसेच सांस्कृतीक सामाजिक कार्यक्रम घेऊन बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.