गणरायाचे आगमन काही दिवसांवर

शेवटचा हात फिरविण्यात मूर्तिकार व्यस्त

| धाटाव | वार्ताहर |

श्रावण महिना संपत आला असून गणरायाचे आगमन काही दिवसांवर आले आहे. या सणानिमित्त मुंबई, पुणे, कोल्हापूर सारख्या महानगरात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. पण तळकोकणातील या सणाची नजाकत काही वेगळीच असून बाप्पाचे आगमन म्हणजे लहान थोरांचा श्रध्देचा विषय आहे. एका वर्षाने बाप्पा आपल्या घरी येणार असल्याने महिला वर्ग घरातील साफसफाईच्या कामात व्यस्त आहेत. तर, मखर सजविण्यापासुन गणरायाच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यवर बच्चे कंपनीने भर दिला आहे. रोह्यात सध्या बाप्पांची मुर्ती साकारणाऱ्या कला केंद्रांमध्ये बाप्पांच्या मुर्त्यांवर शेवटची रंगरंगोटी करण्याचे कामही जोमात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

रोहा शहरासह ग्रामीण भागातून विविध कलाकेंद्रात सध्या गणेश मुर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. वरसे विभागात धाटावमधे यशवंत रटाटे, यदुराम रटाटे यांच्या नारायण कला केंद्र, किल्ला गावात वागळेकर यांचे अश्विनी कला केंद्र, तळाघर गावातील संदेश मोरे यांचे वरदविनायक कला केंद्र तर मनोज कळंबे यासह रोठ्खुर्द गावात मुकुंद मोरे यांचे पांडुरंग कला केंद्र आणि वरसे गावातील संदीप मेस्त्री यांच्या गणेश कला मंदिरात मुर्त्यावर रंगाचा, हिऱ्यांचा साज चढविला जात आहे.

मागील तीन पिढ्यांपासून बाप्पांच्या मुर्त्या साकारण्याचे काम या कला केंद्रातून होत असून ग्रामीण भागातील नागरिकांना परवडतील इतक्या रास्त किंमतीत या कला केंद्रात मुर्त्या बनविल्या जातात. केंद्रात तयार करण्यात येणाऱ्या आकर्षक गणेश मूर्तींमुळे या सर्वच केंद्रातील मुर्त्यांना ग्रामीण भागातून मोठी मागणी आहे.
रोह्यासह विभागातील कला केंद्रात तयार होणाऱ्या बाप्पांच्या सुबक आणि आकर्षक मुर्त्यांवर बारीक रेखीव काम करणारी मंडळी मागील तीन पिढ्यांपासून कार्यात आहेत. या कलाकेंद्रांमुळे तरुणांमध्ये मोठा उत्साह असल्याचे पहायला मिळत आहे. तर, बारीक रंगरंगोटी, हिरे व आकर्षक कपड्यांची सुबक आणि रेखीव कामे करण्याची मोठी जबाबदारी येथील मुर्तिकरांच्या कुटुंबातील लहान थोर मंडळीसह महिला वर्गावर आहे.

मागणीप्रमाणे मुर्त्यांची प्रतिकृती
ग्राहकांच्या मागणीप्रमाणे येथील मुर्त्यांची प्रतिकृती येथे साकारली जात असून लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, कोलीवाड्याचा राजा, टिटवाळ्याचा गणपती तसेच इतर अनेक प्रकारच्या आणि विविध वेशभूषा असलेल्या आकर्षक मुर्त्यां याठिकाणी बनवून रंगांचा साज चढविला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाडूच्या मातीचे दर आणि वाहतूक तसेच रंगाचे भाव वधारल्याने महागाईची झळ बसत असून गणेश मुर्त्यांचेही भाव वाढलेले आहेत.
Exit mobile version