| रेवदंडा | वार्ताहर |
गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश कार्यशाळेत मूर्तीकारांची लगबग वाढली आहे. मातीकाम, रंगकाम व आखणी या कामात कारागीर मग्न झाले असून, दिवस व रात्र कामे सुरू आहेत.
आराध्य दैवत गणरायाची मूर्ती बनविण्याचे कसबी कारागीर कार्यशाळेत काम करीत आहेत. विविध रूपातील गणेशमूर्ती साकारताना नाविन्याला प्राधान्य दिले जाते. कार्यशाळेत भक्तांच्या मागणीनुसार मूर्ती बनविण्यावर कसबी कारागीराचा कल असतो. यामध्ये दीड, दोन, तीन, चार, पाच, सहा फुटी उंचीच्या मूर्ती कारागीर घडवित आहेत. शाडू मातीच्या मूर्तीची मागणी भक्तमंडळी करत असल्याने शाडू मातीपासून घडविलेल्या मूर्ती ठिकठिकाणी कार्यशाळेत दिसून येतात.
रेवदंड येथील पूजा आर्ट श्री गणेश कार्यशाळेतील मालक नंदकुमार चुनेकर यांच्याशी संपर्क साधला असता, कार्यशाळेत कुशल व कसबी कारागीरांची तीव्र समस्या असून, युवावर्ग मूर्ती घडविण्याची कला आत्मसात करीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रतिवर्षी रंग, माती आदीचे दर वाढत आहेत, त्यामुळे मूर्तीच्या किमतीत नाईलाजाने वाढ करावी लागत असल्याचे चुनेकर यांनी सांगितले. गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊ ठेपल्याने, सध्या कार्यशाळेत कामाची लगबग सुरू असल्याचे चुनेकर यांनी सांगितले.