| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेने कामोठे परिसरात डांबरीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. परंतु, ते रस्ते पहिल्याच पावसात उखडले गेले आहेत. डांबर वाहून गेल्याने रस्त्यावर वाळू व सिमेंटची खडी उरल्यामुळे सतत अपघातांच्या घटना घडत आहेत. या दुरवस्थेविरोधात पनवेल महानगरपालिकेला वारंवार निवेदने दिली तरीही पालिका प्रशासनाने केवळ आश्वासने देत वेळ मारून नेली आहे. असा आरोप नागरीकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर एकता सामाजिक संस्थेने गांधीगिरीचा मार्ग स्वीकारत आंदोलन छेडले. कामोठे पोलीस ठाण्यासमोरील चौकात प्रतिकात्मक स्वरूपात रस्त्यावरील वाळू, खडी आणि पाणी नागरिकांनी स्वतः साफ केले. जनतेलाच झाडू हातात घ्यावा लागतोय, मग पालिका व लोकप्रतिनिधींचे काम कोण करणार? असा थेट सवाल आंदोलकांकडून केला जात आहे.
आंदोलनादरम्यान, स्थानिकांनी सांगितले की, रस्त्यांवरील खडी व वाळूमुळे दुचाकी घसरून अनेक अपघात होत आहेत. हे टाळण्यासाठी आता आम्हालाच रस्ते स्वच्छ करावे लागले. जर अशीच परिस्थिती राहिली, तर मोठ्या प्रमाणावर लोकच रस्त्यावर उतरतील. या आंदोलनाचे नेतृत्व अमोल शितोळे यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद भगत, शंकर म्हात्रे, मंगेश अढाव, बापू साळुंखे, देवानंद बाठे, अरुण जाधव, गौरव पोरवाल, संगीता पवार, उषा डुकरे, जयश्री झा, अनिल पवार, सुरज गोविलकर, डॉ. दशरथ माने, गणेश शिंदे, अल्पेश माने यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामोठ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात गांधीगिरी
