नव्या एसटीची मागणी नसल्याने जुन्या गाड्याचं वापर; गणेशभक्तची नाराजी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तालुक्यातील चाकरमान्यांनाही आपापल्या गावी येण्याचे वेध लागले असून, त्यासाठी अनेकांनी आधीच बसचे बुकिंग करुन ठेवले आहे. दरम्यान, मुरुड आगार व्यवस्थापनाकडून नव्या एसटी बसची मागणी न केल्याने जुन्याच गाड्यांचा वापर गणेशोत्सवादरम्यान होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुरुड तालुक्यात गणेशोत्सवाकरिता मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, नालासोपारा, ठाणे, पनवेल, रोहा, बोरिवली आदी भागातून अनेक गणेशभक्त तालुक्यातील आपापल्या गावी गणेशोत्सवाकरिता येत असतात. त्याकरिता गणेशभक्त आधीच एसटीची बुकींग करत असल्याने रिझर्व्हेशन फुल झाले आहे. दरम्यान, मुरुड एसटी आगाराकरिता दहा नव्या गाड्या सामील झाल्या होत्या. परंतु, रेवदंडा पुलांच्या दुरुस्तीनंतर जास्त वजनाच्या गाड्यांना बंदी केल्याने त्या गाड्या परत गेल्या. सध्या मुरुड एसटी आगारात 36 गाड्या उपलब्ध आहेत. त्या किती चांगल्या, किती नादुरुस्त हे वेळच ठरवेल, अशी अवस्था आगाराची झाली आहे. मुरुड आगाराला कोणीच वाली नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी चर्चा प्रवाशांमधून होत आहे.
मुरुड-अलिबाग मार्गे व भालगाव मार्गे मुंबई तसेच बोरिवली, ठाणे, कल्याण सर्व गाड्यांचं रिझर्व्हेशन फुल झाले आहे.
महेश कारभारी, कर्मचारी, रिझर्व्हेशन कार्यालय
अद्याप गणेशोत्सवाकरिता नवीन गाड्यांची मागणी केली नाही. पुढील महिन्यात वरिष्ठांबरोबर बैठक आहे. त्यामध्ये निर्णय होईल. तशी वेळ आलीच तर आम्ही सोयीनुसार गाड्यांची मागणी करु.
नीता जगताप, आगार व्यवस्थापक