नक्कल करणाऱ्यांना लगाम; मुर्तीकारांमध्ये उत्साह
| पेण | प्रतिनिधी |
पेण येथील गणेशमूर्तींना जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे पेणच्या गणेशमूर्तींची हुबेहूब नक्कल करून ती मूर्ती पेणची असल्याचे सांगून गणेशभक्तांची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसला आहे.
पेणमध्ये तयार होणाऱ्या गणरायाच्या मूर्तींना भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळण्यासाठी चेन्नईच्या जीआय नोंदणी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता गणेश मुर्तींना मानांकन मिळाल्यामुळे त्याचा फायदा जागतिक स्तरावर होणार आहे. भविष्यात जगभरातून पेणच्या गणेशमूर्तींना जास्त प्रमाणात मागणी वाढेल. त्यामुळे भक्तांना पेणच्या कलाकारांनी बनवलेली खरी मूर्ती मिळेल, तर गणेश मूर्तिकारांना मागणी वाढल्याने चांगला मोबदला मिळू शकेल.
भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग हा मुख्यत्वे कृषी व्यवसायाशी संबंधित मिळतो. मात्र हे मानांकन बिगर कृषी व्यवसाय असणाऱ्या गणपती व्यवसायाला देऊन त्या व्यवसायाचा गौरव केला आहे.
भौगोलिक मानांकनाचा फायदा
भौगोलिक मानांकनामुळे फसवणूक थांबण्यास मदत होते. भारतात नव्हे तर जगभरात मिळालेले मानांकन त्या-त्या ठिकाणची ओळख निश्चित करते. आज पेणच्या गणेशमुर्तींना हे मानांकन मिळाल्यामुळे मुर्तींच्या मागणीत निश्चितपणे वाढ होईल. तसेच जगप्रसिद्ध गणेशमुर्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण शहराची ओळख कुणालाही मिटवता येणार नाही.
मानाकनाचं महत्व
पेणच्या गणेशमुर्तींची नक्कल करुन अथवा नावाचा वापर करुन गणेशभक्तांची कुणीही फसवणूक करु शकणार नाही. तसे केल्यास तर तेे कायद्याचं उल्लंघन ठरू शकतं. तसेच यासाठी तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
पेणच्या गणेशमुर्ती सांगून मुंबई, ठाणे, पुणे, नागपुर या महानगरांमध्ये सर्रास गणेशभक्तांची फसवणूक होताना दिसते. मात्र या व्यवसायामध्ये काम करताना त्या मुर्ती पाहूनच त्या पेणच्या मुर्ती नसल्याचे समजायचे. आता मानांकन मिळाल्याने आम्ही फसवणूक करणाऱ्यांवर नक्कीच आक्षेप घेऊ. तसेच कारवाईचीही मागणी करू. मानांकन मिळाल्याने सर्व गणपती व्यवसायिक आनंदी आहेत.
अजित लांगी, मुर्तीकार श्री गावदेवी कला केंद्र