। मुरुड-जंजिरा । वार्ताहर |
मुरूड परिसरात गणरायाचा जयघोष करीत मंगळवारी (दि.17) गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी मुरूड परिसरातील समुद्रकिनारी आणि नदीमधून सुमारे 2 हजार गणेश मूर्तींचे शांततेत विधिवत विसर्जन झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुरूड नगरपरिषद कर्मचार्यांनी समुद्रकिनारी विसर्जन मार्गावर स्वागत फलक, पथ दिवे, विद्युत रोषणाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जीवरक्षक, निर्माल्य संकलन कलश, मार्गदर्शक कर्मचारी आदींची व्यवस्था केली होती. तसेच, 250 पेक्षा अधिक पोलीस, एसआरपी आणि सुरक्षा बलाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याआधी गौरी-गणपती विसर्जन दिवशी मिरवणुकीवर दोन मुस्लिम मुलांनी दगड मारल्याने मुरूड परिसरात वातावरण कलुषित झाले होते. अधिक अनुचित प्रकार वाढू नये यासाठी मुरूड शहरातील जुनी पेठ, दत्तवाडी, भोगेश्वर आळी, बाजारपेठ, गणेश आळी, पेठ मोहल्ला, लक्ष्मी खार आदींसह संवेदनशील भागात अलिबाग विभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, मुरूड पोलीस निरीक्षक उदय झावरे, उपनिरीक्षक अविनाश ढाकरे, मकरंद पाटील, प्रशांत लोहार, विक्रांत बांधणकर यांच्यासह पोलीस कर्मचार्यांकडून रुट मार्च काढण्यात येऊन शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले होते. विसर्जन सोहळ्यादरम्यान मुरूड बाजारपेठ ठिकाणी अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी विनित चौधरी, मुरुड तहसीलदार रोहन शिंदे हे शहरात प्रत्येक ठिकाणी मिरवणूकीवर लक्ष ठेवून होते. तसेच, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस उपनिरीक्षक दिपक राऊळ, पोलीस नाईक किशोर बढारे यांच्यासह आरसीपीच्या 30 अंमलदारांचा बाजारपेठेत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गणेशोत्सवाचा लक्षणीय उत्साह
घरगुती गणेशोत्सव ही मुरूड तालुक्याची परंपरा आणि खासियत असल्याने गणेश दर्शन घेण्यासाठी चारमानी आणि स्थानिक नागरिक, ग्रामस्थांची वर्दळ गावागावातून दिसत होती. खारआंबोली, शिघ्रे, जोसरांजन, वाणदे, उंडरगाव, शिघ्रे नवी वाडी, विहूर, नांदगाव, मजगाव, बोर्ली, बारशिव, आदाड, वावे एकदरा, राजपुरी, डोंगरी, आगरदांडा, उसडी, सावली, जमृतखार, टोकेखार, मिठागर, दांडे, काशीद, सर्वे, उसरोली आदी गावांतून गणेशोत्सवाचा उत्साह लक्षणीय होता.