गणेशोत्सव आणखी उत्साहात साजरा करणार

| अलिबाग | प्रतिनिधी |

आमच्या गणेशोत्सवात पोलिसांनी केलेली कारवाई, याचा उत्सवाशी काहीही संबंध नाही, असा दावा केतकीचा मळा येथील चंद्रकांत बैकर यांनी केला आहे. यापुढे हा गणेशोत्सव आणखी उत्साहात साजरा करु, असा निर्धारही श्री. बैकर यांनी केला आहे.

आमच्या 30 वर्षांची परंपरा असलेल्या 21 दिवसांच्या गणेशोत्सवाला विनाकारण गालबोट लागले आहे, अशी खंतही श्री. बैकर यांनी व्यक्त केली. आमचा हा नवसाला पावणारा गणपती असून, भाविकांची मोठी जत्रा असते. याठिकाणी 21 दिवस विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी पंचक्रोशितील शेकडो भक्त उपस्थित असतात. त्यांच्यासाठी अन्नदान, चहा-नाश्ता आदींची व्यवस्था करण्यात येते. स्वखर्चातून मी हा उत्सव साजरा करतो, त्यासाठी कोणतही दानपेटीसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात येत नाही. खारेपाटातील सर्वात मोठी विसर्जन मिरवणूक माझ्या गणरायाची असते, अशी माहिती चंद्रकांत बैकर यांनी दिली. आमचा हा उत्सव बंद पडावा, अशी काही समाजकंटकांची इच्छा असून, त्यासाठी त्यांनी असे कृत्य केले. परंतु, अशा लोकांकडे मी लक्ष देणार नाही. उलट, दरवर्षी आणखी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करेन, असेही ते म्हणाले.

Exit mobile version