। अलिबाग । प्रतिनिधी ।
दुसर्या साऊथ आशियाई थाय बॉक्सींग चॅम्पीयनशीप स्पर्धेत अलिबागच्या रुद्र संजय बैकर याने सुवर्ण कामगिरी बजावली आहे. भारताचे नेतृत्व करीत त्याने सुवर्ण पदक मिळवून अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याच्या या कामगिरीबद्दल रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुका व कुर्डूस नवखार गावाचे नाव लौकिक झाले.
रुद्र बैकर हा तरुण अलिबाग तालुक्यातील कुर्डूस नवखार येथील रहिवासी आहे. तो सध्या शिक्षणासाठी पनवेल येथे राहत आहे. गेल्या पाच वर्षापासून तो बॉक्सींग खेळामध्ये प्राविण्य मिळवत आहे. त्याचे चुलते योगेश बैकर हे बॉक्सींग प्रशिक्षक आहेत. काकांसोबत राहून त्याला बॉक्सींग खेळाची आवड निर्माण झाली. त्याची या खेळामधील आवड बघून रुद्रच्या आई, वडिलांनी प्रोत्साहन दिले. जिल्हास्तरावर 12, राज्यस्तरावर तीन व राष्ट्रीय स्तरावर दोन तसेच आशियाई स्तरावर एक अशी एकूण 18 हून अधिक पदके त्याने या खेळातून मिळविली आहेत. त्यामध्ये चारहून अधिक सुवर्ण पदके मिळवली आहेत. नुकतीच भोपाळ याठिकाणी 17 ते 19 या कालावधीत दुसरी साऊथ आशियाई थाय बॉक्सींग चॅम्पीयनशीप स्पर्धा पार पडली. 30 किलो वजनी गटातून थाय बॉक्सींग क्रीडा प्रकारात खेळताना रुद्र बैकर याने चांगली कामगिरी बजावली. त्याच्या कामगिरीबद्दल त्याला सुवर्ण पदकाने सन्मानित केल्याची माहिती संजय बैकर यांनी दिली आहे.