चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद

| पनवेल | वार्ताहर

पनवेल तालुक्यातील नेरे महालक्ष्मी नगर येथे चार ते पाच चोरटे एका इमारतीमध्ये सावधरित्या शिरताना कॅमेरात कैद झाले आहेत. हे चोरटे हलक्या पावलांनी महालक्ष्मी नगरमधील बिल्डिंगमध्ये चोरी करण्यासाठी जात असताना दिसून येत आहेत. या चोरट्यांकडे शस्त्र असल्याचे दिसून आले आहे. बंद घराच्या कडीकोयंडा तोडण्यासाठी व तिजोरी फोडण्यासाठी लागणारी हत्यारे त्यांच्याकडे दिसून येत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नेरेमध्ये महालक्ष्मीनगर ही मोठी वसाहत आहे. मध्यरात्री चार ते पाच चोरटे सशस्त्र चोरी करण्याचे उद्देशाने आले असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. नेरे परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. अनेक मोठमोठ्या इमारती या ठिकाणी उभ्या राहिले आहेत. यापूर्वी देखील नेरे मध्ये अनेक चोर्‍या झालेल्या आहेत. ज्वेलर्स, सुपर मार्केट व इतर ठिकाणी चोरट्यांनी चोर्‍या केल्या होत्या. चार ते पाच चोरटे अशाच प्रकारची चोरी करण्यासाठी महालक्ष्मी नगर सोसायटीमध्ये शिरले. याठिकाणी कोणतीही चोरी झाली नाही. मे महिना सुरू असल्याने अनेक जण गावी गेले आहेत. त्यामुळे हे चोरटे बंद घराना सावज करत आहेत. या प्रकाराची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली. चार ते पाच जणांच्या चोरांच्या टोळीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. या चोरांचा बंदोबस्त करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी येथे रहिवासी करत आहेत.

Exit mobile version