शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात मुलीवर सामुहिक अत्याचार

| अकोला | वृत्तसंस्था |

शहरातील एका प्रख्यात शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात एका 14 वर्षीय मुलीवर तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिव्हील लाइन्स पोलिसांनी अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांसह एका सेल्समनला अटक केली आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

अकोला शहरातील मोठी उमरी भागातील रहिवासी असलेल्या एका महिलने तिच्या 14 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला कलम 363 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्याच दिवशी ही मुलगी घरी परतली. तिने तिच्यावर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचे सांगितल्यावर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तात्काळ आईने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सामूहिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासात प्राप्त माहितीनुसार पीडित मुलीला अनुराग मनोहर चौधरी (20) यावल, जळगाव याने दुचाकीवर बसवून शहरातील रामदास पेठ हद्दीमधील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेले. तेथे आरोपी अनुराग, त्याचा मित्र दीपक विठ्ठल मडावी (25) सिंधी कॅम्प, अकोला, तसेच अंकुश विलास वक्टे (25) कौलखेड, अकोला यांनी मिळून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींपैकी अनुराग व दीपक हे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून अंकुश सेल्समनचे काम करतो. या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version