सावधान! लहान मुलांना बोगस डोस देणारी टोळी फिरतेय

। मळेघर । प्रतिनिधी ।
कोरोनाचे दोन डोस आणि तिसरा बूस्टर डोस याच पाठोपाठ लहान मुलांना सुवर्ण प्राशन डोस देत असल्याचा बनाव करीत पेण तालुक्यात खारेपाटातील वाशी ग्रामपंचायतीत काही जण फिरत होते. आरोग्य खात्यातील अधिकारी असल्याचे भासवून शनिवारी (ता. 6) सकाळी दहाच्या सुमारास 4 महिला व 5 पुरुष असे 9 जणांचा समूह वाशी गावातील प्रत्येक आळीत फिरत होता. गावातील लहान मुलांना सुवर्ण प्राशन डोस देणार असून नोंदणी की 30 रुपये व डोस दिल्यानंतर 250 रुपये आकारले जातील, असे सांगून हे सर्वजण पैसे उकळत होते. ही बाब सरपंच गोरख पाटील यांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी तत्काळ वडखळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

सुवर्ण प्राशनचा डोस देणारी महिला डॉक्टर तुमच्याच गावातील आहे, असे सांगून ही मंडळी गावात फिरत होती व नाव नोंदणी करत होती. सरपंचांनी चौकशी केली असता, अशा कोणत्याही प्रकाराची माहिती नसल्याचे सांगितले. सरपंचानी डोस देणार्‍या नऊ जणांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून चौकशी केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नव्हते. तसेच आरोग्य विभागाचेही पत्र नव्हते. त्यांच्या वरिष्ठांना बोलावले असता, तेही येण्यास टाळाटाळ करीत असल्याने लक्षात येताच, ही मंडळी लहान मुलांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे आढळल्याने गोरख पाटील यांनी वडखळ पोलिस ठाण्याशी संपर्क केला. पोलिसांनी वाशी येथे धाव घेत चौकशीअंती, फसवेगिरी करणार्‍या टोळीला ताब्यात घेतले.

गावात कोणीही अनोळखी व्यक्ती अशा प्रकारचे डोस किंवा इतर आरोग्य साहित्य देण्यासाठी फिरत असल्यास वाशी, खारेपाटतील नागरिकांना सावध राहावे. त्यांचे ओळखपत्र तपासावे, त्यांनी रीतसर ग्रामपंचायतीची परवानगी घेतली आहे का, याची चौकशी करावी.

गोरख पाटील, सरपंच, वाशी ग्रामपंचायत



वाशी गावात लहान मुलांना सुवर्ण प्राशनचा डोस देण्यासाठी कोणत्याही संस्था अथवा आरोग्य खात्याकडून माहिती आली नव्हती. या बाबत कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही. परंतु कोणीही बनाव करून असे सांगत असतील तर त्याच्यावर विश्‍वास ठेऊ नये, तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करावा.

– अपर्णा खेडेकर, आरोग्य अधिकारी, पेण
Exit mobile version