Crime News: करळ फाटा ब्रिजखाली गांजाविक्रीचा पर्दाफाश

न्हावा-शेवा पोलिसांची धडक कारवाई; तरुण अटकेत

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या विळख्यातून युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना न्हावा-शेवा पोलिसांनी करळ फाटा परिसरात धडक कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 80 ग्रॅम गांजा आणि मोबाईल असा एकूण 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

न्हावाशेवा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.19) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास करळ फाटा ब्रिजखाली, करळ गाव परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई प्रविण वसंत गावित यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनवर जमाल अंसारी (26) रा. जसखार गाव, रत्नेश्वरी मंदिराजवळ, ता. उरण असे आहे. आरोपीच्या ताब्यातून हिरवट रंगाचा, उग्र वास येणारा, कोरड्या स्वरूपातील गांजा 80 ग्रॅम वजनासह जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे 20 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीकडून 7 हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि श्रीकांत नायडू करीत आहेत. ही कारवाई वपोनि दिपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच सहायक पोलीस निरीक्षक मनोज गूंड यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

उरण शहरातील पानटपऱ्या, झोपडपट्टी परिसर तसेच ट्रेलर पार्किंग परिसरात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन वाढत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी काही संशयित टोळक्या खुलेआम नशेचे व्यवहार करत असल्याचे बोलले जात असून त्यामुळे युवकांचे भविष्य अंधारात जात असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

“फक्त एखादा आरोपी पकडून चालणार नाही, तर संपूर्ण अंमली पदार्थ रॅकेट उद्ध्वस्त झाले पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. उरण परिसरात पोलिसांनी नियमित कोंबिंग ऑपरेशन राबवून संशयित अड्डे, पानटपऱ्या आणि ट्रेलर पार्किंग परिसरांवर धडक कारवाया कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version