| नवी मुंबई | प्रतिनिधी |
ट्रेलरमधून पोकलेन उतरवित असताना चालकाचे पोकलेनवरील नियंत्रण सुटल्याने घाबरून पोकलेनमधून खाली उडी मारणार्या चालकाच्या अंगावर पोकलेन पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी उरणमधील करळ सोनारी फाटा येथील रेल्वेच्या एका प्रकल्पस्थळी घडली. या अपघाताला स्वत: पोकलेन चालक जबाबदार असल्याचे आढळून आल्याने न्हावा-शेवा पोलिसांनी त्याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
अजयकुमार मंगर महातो (वय 28) असे मृताचे नाव असून तो मूळचा झारखंडमधील वहाळ गाव येथे राहत होता. तसेच, तो पोकलेन चालक म्हणून काम करीत होता. उरणमधील करळ सोनारी फाटा येथील जासईकडे जाणार्या ब्रिजलगत सुरू असलेल्या रेल्वेच्या साइटवर पोकलेनचे काम असल्याने त्या ठिकाणी ट्रेलरवरून पोकलेन नेण्यात आला होता. यावेळी अजयकुमार हा ट्रेलरवरून पोकलेन खाली उतरवत असताना पोकलेनवरील त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पोकलेन ट्रेलरवरून खाली पडणार याची अजयकुमार याला चाहूल लागताच त्याने पोकलेनमधून खाली उडी मारली; मात्र याचवेळी ट्रेलरवरील पोकलेन अजयकुमार याच्या अंगावर पडल्याने त्याच्याखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. न्हावा-शेवा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.