। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. परिणामी निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेल्या निसर्गरम्य गारंबी- सवतकडा-अंबोली धबधबा व त्याबरोबर छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. मुसळधार पाऊसाने तालुक्यातील सर्वच धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. हिरव्यागार पर्वतरांगा त्यावर निसर्गाने पांघरलेली दाट धुक्याची पसरलेली चादर उंच कड्याकपारीतुन खोल दरीत कोसळणारे धबधबे हिरव्यागार पर्वतरांगेतून नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता अंगाला झोंबणारा गार वारा त्यातुनच अधुनमधून येणार्या पावसाच्यासरी या सर्व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल होतील. सवतकडा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला धबधबा असून या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने पर्यटकांना अतिशय काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा लागतो.